पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/८७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

८२ स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ. [ नवम

बदलतें असा सिद्धांत काढण्यास काय प्रत्यवाय आहे ? यावरून तुम्ही, मी व जगांतील प्रत्येक वस्तु ही सारी पूर्ण ब्रह्मरूप आहेत हा वेदान्तशास्त्राचा सिद्धांत आहे हे आपल्या लक्ष्यांत आले असेलच. आपण सारे ब्रह्माचे भाग अथवा लहान लहान तुकडे नसून संपूर्ण ब्रह्म आहों असें वेदान्तशास्त्राचे म्हणणे आहे. जगांतील प्रत्येक वस्तु केवलरूप, स्वयमेव आणि पूर्ण आहे; कारण ब्रह्माच्या ठिकाणी भाग संभवत नाहीत. आपणास जे भाग ह्मणून दिसतात, तो निवळ देखावा आहे. हे भाग मूळ वस्तूंत निर्माण झाले नसतांही तसा देखावा मात्र दिसत असतो. मी पूर्ण ब्रह्म असून सदामुक्त आहे. बद्ध असा मी कधीच नव्हतो. मी बद्ध आहे असा आपला समज तुह्मीं करून घेतला की मग मात्र तुमच्या पायांत श्रृंखला पडतात; पण मी मुक्त आहे असा अनुभव तुह्मास एकवार आला, की तुम्ही पुन्हां केव्हाही बद्ध होत नाही असें छाती ठोकून वेदान्त तुझांस सांगत आहे. वेदान्तशास्त्राच्या साऱ्या अट्टहासाचा हेतु हाच की तुह्मी मुक्त आहां, हे तुमच्या ध्यानी आणून द्यावें. तुम्ही पूर्वी केव्हांच बद्ध नव्हता, सांप्रत नाही आणि भविष्यत् कालीही तुम्ही बद्ध होणार नाही, अशी तुमची पक्की खात्री पटवून द्यावी, या एकाच हेतूनें वेदान्तशास्त्राने एवढें अफाट साहित्य निर्माण केले आहे. आपणांत केव्हाही बदल होत नाही; आपण केव्हाही मरत नाही आणि आपण केव्हां जन्मही घेत नाही. आतां या वेदान्त मतावर कोणी अशी शंका काढील की मग जन्म, बाल्य, तारुण्य, वार्धक्य आणि मृत्यु या वस्तूंचे स्वरूप तरी काय ? या साऱ्या स्थिती प्रत्यही आह्मांस दिसतात. जगाचे अस्तित्वही हरघडी आमच्या प्रत्ययास येत असते. मग या साऱ्या देखाव्याचे होणार तरी काय ? यावर वेदान्तशास्त्राचे उत्तर असें आहे की जगाला बाह्यतः जें अस्तित्व आहे तें काल, दिशा आणि कारण यांच्या उपाधीनें उत्पन्न झालेले आहे. प्रकृतीच्या उत्क्रांतीमुळे केवलरूप अनेक प्रकारें स्पष्टत्वास आल्यासारखे दिसते; तथापि हा निवळ भ्रममूलक देखावा आहे. वास्तविक केवलरूपाचे भाग पडत नाहीत आणि ते अनेक रूपें धारणही करीत नाही. याला संस्कृतांत विवर्तवाद असें नांव आहे. केवल रूपांत कांहीं बदल होत नाहीं अथवा त्यांत कसली उत्क्रांतिही होत नाही. अत्यंत क्षुद्र जंतूंत तें ब्रह्म पूर्णरूपानेच आहे. उपाधीमुळे तें अपूर्ण रूप दिसते इतकेंच.