पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/८६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

खंड ] वेदान्त व हक्क. ८१

होती त्यांचा आरोप त्यांनीच त्या बुंधक्यावर केला. प्रत्येक प्रेक्षकाने स्वतःच्या मनांतील रूप पाहिले आणि तो बुधका तें रूप आहे असे म्हटलें.
 बाह्य जगांतील वस्तुजाताचे वास्तविक स्वरूप काय आहे हे आपणास ठाऊक नाही आणि ते ठाऊक होणे शक्यही नाही. अंतःसृष्टि आणि बाह्यसृष्टि यांच्या स्वरूपाचे विवेचन आपण मागे केले तेव्हां ' य ' आणि ' क्ष ' अशी गृहीत धरून या दोन्ही सृष्टी आपणच उत्पन्न केलेल्या आहेत हैं सिद्ध केले असल्याचे तुमच्या लक्ष्यांत असेलच. सर्व अंतर्बाह्य सृष्टि दोन वस्तूंच्या समीकरणांतून निर्माण झाली आहे. या दोन वस्तूंपैकी एक आपले मन ही असून दुसरी वस्तु बाह्यगत पदार्थ ही आहे. या विवेचनांत ' क्ष ' आणि ' य ' या गृहीत वस्तूही खरोखर वेगवेगळ्या नसून त्या एकच आहेत असें वेदान्ताचे मत आहे.
 हाच सिद्धांत कांहीं पाश्चात्य तत्त्ववेत्त्यांनीही सिद्ध केला आहे. अशा तत्त्ववेत्त्यांच्या मालिकेंत हर्बर्ट स्पेन्सर यांची गणना प्रामुख्याने होते. फलपुष्पाच्या रूपाने जी मूलशक्ति सृष्टीत आपल्या प्रत्ययास येते तीच शक्ति माझ्या मनाच्याद्वारे कार्यकारी होते हा पाश्चात्य तत्त्वज्ञांचा सिद्धांत आणि पौर्वात्य वेदान्तवाद्यांचा सिद्धांत यांत खरोखर कांहींच फरक नाही. बाह्यसृष्टीचे वस्तुरूप आणि माझ्या अंतःसृष्टीचे वस्तुरूप यांत कांहींच भेद नसून ही दोन्ही रूपें वस्तुतः एकरूप आहेत असें वेदान्त्यांचे म्हणणे आहे. पाश्चात्त्य पंडित आणि पौर्वात्य वेदान्ती हे येथे एकमेकांच्या जवळ किती आले आहेत-किंबहुना एकरूपच झाले आहेत हे पाहण्यासारखे आहे. फार काय, पण ही अंतर्गत सृष्टि आणि ही बहिर्गत सृष्टि हा भेदसुद्धां केवळ उपाधीमुळे उत्पन्न झालेला आहे. उदाहरणार्थ, आपण अशी कल्पना करूं की जर आपल्या पांच इंद्रियांत आणखी एका सहाव्या इंद्रियाची भर पडली, तर अशा स्थितींत हे सारे विश्व सांप्रतच्या रूपाहून कांहीं वेगळ्याच रूपाचे आपणांस दिसूं लागेल हे उघड आहे. बाह्य विश्वाचे स्वरूप अमुक ह्मणून जो कांहीं निश्चय आपण केलेला असतो, तो आपल्या पांच इंद्रियांच्या साक्षीवर विश्वासून केलेला असतो. आतां यांतच आणखी एखाद्या इंद्रियाची भर पडली तर तें या विश्वाची कहाणी काही निराळ्याच रीतीने सांगेल आणि त्यामुळे आपली विश्वाची कल्पना पार बदलून जाईल. यावरून मी बदललों की जगस्वा० वि०९-६