पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/८०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

खंड ] सांख्य आणि वेदांत. ७५

तिने आपला गुण मनापासून उसना घेतलेला असतो. हाच न्याय 'य' या वस्तूलाही लागू आहे. याकरिता या दोन्ही वस्तू निर्गुण असल्यामुळे एक रूप आहेत. अशारीतीने अंतर्बाह्य सारे विश्व एकरूपच आहे. विश्वांत आत्मरूप म्हणून जे आहे तें एकच आहे. विश्वांत सारें अस्तित्व एकरूप आहे. तें एकच आहे, आणि देश, काल व कारण या उपाधीच्या द्वारे ते स्पष्टत्वास येते तेव्हां त्या एकासच अनेक नांवें प्राप्त होतात. बुद्धि, सूक्ष्म तत्त्वे, जड तत्त्वे, मन इत्यादि अनेक नांवें या एकाच अस्तित्वाला अशा प्रकारे प्राप्त झाली आहेत. विश्वांत जे काही आहे तें सारें एकच आहे, आणि तें एकच अनेक प्रकारच्या रूपांनी दिसते. त्या अनंत अस्तित्वाचा अल्पसा अंश काल, देश आणि कारण या उपाधीच्या जाळ्यांत सांपडतो आणि अनेक प्रकारच्या आकारांनी तो दिसू लागतो. त्याजभोंवतीं हे जाळे पसरलें म्हणजे जें एक शिल्लक उरतें तेंच ब्रह्म अथवा आत्मरूप. हे आत्मरूप विश्वदेहाच्या अधिष्ठानी राहून त्याचे शासन करतें तेव्हां त्याला परमेश्वर असें नांव प्राप्त होते; आणि हेच आत्मरूप या लहानशा विश्वाच्या म्हणजे एका देहाच्या अधिष्ठानी असते तेव्हां तेंच जीवात्मा म्हणविते. मनुष्यांतील जीवात्मा हेच त्याचे परमात्मरूप होय. अशा रीतीनें साऱ्या विश्वांत एकच पुरुष आहे, आणि वेदान्ताने त्याला ब्रह्म अशी संज्ञा लावली आहे. जीवात्मा आणि परमेश्वर यांजवर भासमान होणारी आवरणें काढून टाकली म्हणजे त्यांच्यांत भासमान होणारा फरक नाहीसा होऊन ते एकरूप होतील. ब्रह्माच्या ठिकाणी हा जीवात्मा आणि परमात्मा असा भेद नाही. देहाच्या उपाधीमुळे तुम्ही अल्पसे भासतां पण परमार्थदृष्ट्या तुम्ही विश्वरूप आहा. तुम्ही जेथें नाहीं असें एकही ठिकाण विश्वांत नाही. साऱ्या हस्तांनी तुम्हीच कर्मे करीत आहां. सर्व मुखांच्या द्वारे भक्षणाची क्रिया तुम्हीच करीत आहां. सर्व नासापुटांच्या द्वारे श्वासोच्छ्वासाची क्रिया तुम्हीच करीत आहां, आणि सर्व मनांच्या द्वारे विचार करण्याची क्रियाही तुम्हीच करीत आहां. सारे विश्व तुम्हीच आहां. सारे दृश्यजात हा तुमचा देह आहे. दृश्य आणि अदृश्य अशा दोन्ही प्रकारचे विश्व तुम्हीच आहां. या विश्वदेहाचा आत्मा तुम्ही आहां, आणि देहही तुम्हीच आहां. परमेश्वर तुम्ही आणि देवादिकही तुम्हीच. मनुष्य तुम्ही आणि पशूही तुम्हीच. साऱ्या