पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/७९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

७४ स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.[ नवम

घटक मिळून आपले मन झाले आहे. या तिहींस अस्तित्व नसेल तर मनपण म्हणून जो भाव आहे तो कधीही अस्तित्वात आला नसता. या तिहींचें जें समवायीरूप तेंच मन. कालकल्पना अगोदर असल्याशिवाय कोणत्याही वस्तूबद्दल विचार करणे तुम्हांस शक्य नाही. त्याचप्रमाणे देशकल्पनेशिवाय कोणत्याही वस्तूची कल्पना तुम्हास करता यावयाची नाही. कोणतीही वस्तु तुम्ही चित्तांत आणून पहा, म्हणजे तिचे निवासस्थान अगोदर तुमच्यापुढे उभे राहते. त्याचप्रमाणे कारणावांचून कार्य असल्याचे आपल्या मनात कधीच येत नाही. अमुक एक वस्तु कार्यरूप आहे असें मनांत आल्याबरोबर तिचें काही तरी कारण असलेच पाहिजे असें आपोआपच आपल्या मनांत येतें. कारणावांचून कार्य नाही हा सिद्धांत आपल्या मनाने पक्का ठरविला आहे. अशा प्रकारे आपले मन त्रिविधरूप आहे. आपल्या एकाच मनाची ही तीन रूपं आहेत असे म्हणा; अगर ही तीन रूपे मिळून आपले मन होते असे म्हणा. हे तीन घटक ज्या क्षणीं अस्तित्वांतून जातील त्याच क्षणी आपले मनही नाहीसे होईल. यामुळे काल, देश आणि कारण या त्रिविध घटकांचे मनाच्या योगाने सर्व प्रकारचे भेद उत्पन्न झाले आहेत. याच मनानें 'क्ष' आणि 'य' या वस्तूंचा दृश्याभास उत्पन्न केला असून त्यानेच ही बाह्यसृष्टि आणि अंतःसृष्टीही निर्माण केली आहे. 'क्ष' ही बाह्यसृष्टि आहे ही मनाची कल्पना आणि 'य' ही अंतःसृष्टि आहे हीसुद्धा मनाचीच कल्पना आहे, असें वेदान्तशास्त्राचे म्हणणे आहे; पण वस्तुतः 'क्ष' आणि 'य' या दोन्ही वस्तू मनाच्या हद्दीच्या पलीकडच्या असल्यामुळे त्यांच्यात खरोखर भेदच नाहीं; आणि असा भेद नसल्यामुळे त्या अभेद म्हणजे एकरूप आहेत. मनाची हद्द सुरू झाल्यावांचून भेदाला अस्तित्व नाही पण मनाच्या हद्दीपलीकडे त्याला अस्तित्व असणे शक्य आहे. 'क्ष' आणि 'य' वस्तूंना अमुक गुण आहेत असेंही आपणास म्हणतां येत नाही. कारण गुण कल्पना हासुद्धा मनाचाच धर्म आहे. ज्या दोन वस्तूंत कोणताच गुण नाहीं त्या एकरूप असल्याच पाहिजेत. कारण त्यांच्यांतील भेद गुणधर्मांच्या भिन्नतेमुळेच उत्पन्न झालेला असतो. यामुळे जेथे कोणता गुणच नाही तेथें अभेद असलाच पाहिजे. 'क्ष' या वस्तूला स्वतःचा असा कोणताच गुण नाही. अमुक एक गुण तिला आहे असा आरोप मनाने तिजवर केलेला असतो.