पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/७८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

खंड ] सांख्य आणि वेदांत. ७३

आता यापुढे सांख्यशास्त्रावर आमचा जो आणखी एक आक्षेप आहे तो याहूनही अधिक महत्त्वाचा आहे. अमर्याद, स्वयंभू आणि अमिश्र अशा स्वरूपाचे पुरुष अनेक आहेत असें कपिलांचे म्हणणे आहे. यावर आमचा प्रश्न असा आहे की ही गोष्ट शक्य आहे काय ? पुरुष सर्वव्यापी आणि अनंत आहे असें तुम्हीच म्हणतां; आणि तुमचे हे म्हणणे आम्हांस मान्यही आहे. अनंत आणि सर्वव्यापी स्वरूपं दोन असणे शक्य आहे की काय इतकाच प्रश्न आहे. अशा प्रकारची स्वरूपें एकाहून अधिक असणे शक्य नाही. 'क' आणि 'ख' अशी दोन स्वरूपें अनंत आणि सर्वव्यापी आहेत अशी कल्पना केली तर क' स्वरूप 'ख' ला मर्यादित करील. कारण 'ख' स्वरूप म्हणजे 'क' स्वरूप नव्हे आणि उलटपक्षी 'क' स्वरूप 'ख' नव्हे. ही दोन्ही परस्परांपासून भिन्न असल्याने ती परस्परांस मर्यादित करतील हे उघड आहे. दोहोंत स्वरूपभिन्नता असणे म्हणजेच ती परस्परांपासून विभक्त असणे होय; आणि विभक्तपणा हेच मर्यादितपणाचे लक्षण आहे. एक मनुष्य दुसऱ्याहून वेगळा असे आपण जाणतों तें त्या परस्परांतील लक्षणभिन्नतेमुळे जाणतों हे उघड आहे. दोन माणसें सर्वतोपरी सारखी असली तर त्यांचे वेगळेपण आपल्या समजुतींत येणार नाही. ती आपापल्या विशिष्ट गुणांनी बद्ध आणि मर्यादित असल्यामुळेच त्यांचे वेगळेपण आपल्या प्रत्ययास येतें. त्याचप्रमाणे दोन पुरुषांचे स्वरूप मर्यादित आणि बद्ध असल्यावांचून त्यांच्यांतील विभक्तता आपल्या प्रत्ययास येणे शक्य नाही. यामुळे 'क' आणि 'ख' हे परस्परांस मर्यादित करतात असे म्हटले की त्यांचे अनंतत्व आपोआप नाहीसे झालेच. यावरून अनंतरूप एकच असले पाहिजे असा आमच्या बुद्धीचा निश्चय होतो. म्हणून पुरुष एकच असला पाहिजे.
 आतां पूर्वीच्या आपल्या अज्ञात वस्तू 'क्ष' आणि 'य' यांचा विचार पुन्हा एकवार करून या दोहोंचे स्वरूप एकच आहे की काय हे पाहूं. आपण गृहीत केलेली अज्ञात वस्तु 'क्ष'+आपले मन मिळून बाह्य जग होते हैं आपण मागें सिद्ध केल्याचे तुमच्या लक्ष्यांत असेलच. त्याचप्रमाणे अज्ञात वस्तु 'य'+मन मिळून अंतर्गत सृष्टि निर्माण होते हेही तुम्हांस आठवत असेल. यांपैकी 'क्ष' आणि 'य' या दोन्ही वस्तू अज्ञात आणि अज्ञेय आहेत. काल, देश आणि कारण यांजमुळेच भेद उत्पन्न होतो. हे तीन