पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/७२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

खंड ] सांख्य आणि वेदांत. ६७

आनंद आहे असें वेदान्ताचे मत आहे. तथापि सत्, चित् आणि आनंद हे तीन गुण आहेत असे मात्र नव्हे. आत्मा वेगळा आणि हे गुणत्रय वेगळे असें समजू नये. तर या गुणत्रयाचा जो एकरूप समुच्चय तोच आत्मा. हे गुण त्यापासून वेगळे काढतां येत नाहीत, आणि हे गुणही स्वतः अविभाज्य आहेत - तेही परस्परांपासून भिन्न करता येत नाहीत. बुद्धि ही प्रकृतींतून उत्पन्न झालेली वस्तु आहे हे सांख्यांचे म्हणणे वेदान्ताला मान्य आहे. यामुळे तिचा संबंध पुरुषाशी नसून प्रकृतीशी आहे हे सांख्यमतही त्याला मान्य आहे हे वेगळे सांगावयास नकोच. त्याचप्रमाणे बुद्धि हा स्वयंभू पदार्थ नसून तो मिश्रणाने झाला आहे हेही मत वेदांताला मान्य आहे. उदाहरणार्थ आपणास संवेदनांची जाणीव कशी होते हे पहा. माझ्यासमोर एखादा फळा मी पाहतो. हे ज्ञान मला कोणत्या रीतीने होते? या फळ्याचे स्वयंभू स्वरूप काय आहे, हे मला माहीत नाही. त्याचे ज्ञान मला होत नाही. किंबहुना, असें ज्ञान कधी काळी मला होणे ही गोष्टच शक्य नाही. रस्त्यांत एखादी शिंपली पडलेली असते आणि मी तो रुप्याचा तुकडा पडला आहे असे म्हणतो. माझ्या डोळ्यांनी मला तें रुपे दिसत असते. म्हणजे वास्तविक वस्तु आहे ती न पाहतां मी निराळेच स्वरूप पाहत असतो आणि हा भ्रम शिल्लक असेपर्यंत तें रुपेंच आहे अशी माझी बालंबाल खात्री असते. अशाच रीतीने मला जो फळा म्हणून दिसत असतो ती वस्तु वास्तविकपणे काय आहे हे मला ठाऊक नाही. ती अज्ञात वस्तु 'क्ष' आहे असे आपण समजूं. बाह्यतः फळा म्हणून मला दिसणाऱ्या या वस्तूचे जे खरे पण मला अज्ञात रूप आहे त्याला आपण 'क्ष' असें नांव देऊ. या 'क्ष' रूपाचे किरण माझ्या मनावर येऊन आदळतात, आणि मनाकडून या क्रियेला प्रतिक्रियेच्या रूपाने उत्तर मिळतें. मन हे तळ्यासारखे आहे. एखाद्या तळ्यांत आपण दगड टाकला तर या आपल्या क्रियेला तळ्याकडून लाटांच्या रूपाने प्रतिक्रिया होते. या लाटांचे स्वरूप दगडासारखें नसते. दगड आणि लाट यांत कोणत्याही प्रकारचे स्वरूपसाम्य नसतें. दगड तो दगड आणि लाट ती लाट. या उदाहरणांत आपण घेतलेला दगड म्हणजे तो फळा असे समजा. हा फळारूपी दगड मनोरूपी तळ्यांत आदळतो आणि मनाकडून लाटेच्या रूपाने प्रतिक्रिया घडते. ही प्रतिक्रिया आपण पाहतो आणि तिला फळा असे