पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/७०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

खंड ] सांख्य आणि वेदांत. ६५

लांचे म्हणणे समजले असेल. पुरुषाच्या आजूबाजूला प्रकृति आहे आणि प्रकृतीचे पांघरूण स्वतःवर घेऊन पुरुष प्रकृतिरूप झाला आहे. आपण स्वतंत्र नसून प्रकृतिबद्ध आहों असें तो मानतो आणि “ मी लिंग शरीर आहे, मी जड देह आहे " असे म्हणू लागतो; आणि याच भ्रामकदृष्टीने तो सुखदुःखांचा उपभोक्ता होतो. वस्तुतः सुखदुःखांचा लेप त्याला लागू शकत नाही. सुखदुःखें या फक्त लिंग देहाच्या उपाधी आहेत. त्यांचा संबंध पृरूषाशी यत्किंचितही येत नाही.

 समाधि ही अत्युच्च स्थिति आहे असें योग्यांचे म्हणणे आहे. समाधि म्हणजे पूर्ण समतोलपणाची स्थिति. हीत क्रिया प्रतिक्रिया नाहीं; अथवा हीत अक्रियताही नाही. अक्रियता म्हणजे " मी क्रिया करीत नाही " अशी जाणीव. अशा स्थितीत पुरुषाच्या अत्यंत संनिध आपण असतो. पुरुष सुखदुःखातीत आहे. सुख अथवा दुःख इत्यादि सर्व विकारांचा तो द्रष्टा अथवा साक्षी आहे. सर्व कर्माचा तो निरंतर साक्षी आहे. त्याच्यासमोर घडत नाहीं असें एकही कर्म नाही. तथापि असे असतांही कर्मफलापासून तो अलिप्त आहे. कोणत्याही कर्माचे सुखरूप अथवा दुःखरूप फल तो घेत नाही. प्रत्येकाच्या डोळ्यांतील प्रकाशदाता सूर्य आहे; तथापि डोळ्यांतील कोणत्याही दोषांपासून तो अलिप्त असतो. एखाद्या स्फटिक मण्याच्या मागे तांबड्या अथवा निळ्या रंगाचे फूल ठेवले तर तो स्फटिक तांबड्या अथवा निळ्या रंगाचा आहे असा भास होतो; तथापि त्या रंगाचा लेप वस्तुतः त्याला लागलेला नसतो. याच रीतीने आत्मा अथवा पुरुष कर्माकर्मरहित असतो. तो कर्ता आहे असे म्हणता येत नाहीं; अथवा तो अकर्ता आहे असेही म्हणतां येत नाही. तो कर्माकर्मातीत आहे. या दोहोंच्याही पलीकडचा तो आहे. तो समाधिरूप आहे असे म्हटल्यास ते त्याचे वर्णन बऱ्याच अंशी युक्त होईल. सांख्यशास्त्राचे थोडक्यांत स्वरूप या प्रकारचे आहे.

 प्रकृतीने जी ही इतकी अनंतरूपें धारण करण्याची खटपट केली ती कां, असा एक प्रश्न येथे उपस्थित होण्याचा संभव आहे. इतकी रूपें धारण करण्यांत प्रकृतीचा हेतु काय ? या प्रश्नाला 'पुरुषासाठी' असे उत्तर सांख्यशास्त्राने दिले आहे. ज्या अनेक घडामोडी विश्वांत चालू आहेत त्या स्वतःसाठी प्रकृति करीत नसून तिसऱ्याचसाठी त्या चालू आहेत. क्रिया आणिस्वा. वि० '०५ - ९