पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/६२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

खंड ] सांख्यविचार. ५७

आहे. तो साक्षीभूत आहे आणि त्याच्या अस्तित्वाच्या आधारावरच या घडामोडी होऊन हीं अनेक रूपें निर्माण होतात. तो प्रकृतीत मिसळून जाऊन नष्ट होत नाही. प्रकृतींत तो मिसळतच नाही. तो बुद्धि नव्हे अथवा महत् ही नव्हे. तो कोणापासून उत्पन्न झालेला नसून तो स्वयमेव आहे. तो संघटित रूपाचा नसून शुद्ध एकरूपाचा आहे. " मयाध्यक्षेण प्रकृतिः सूयते सचराचरम् । " पुरुषाच्या अधिष्ठानाच्या आधाराने प्रकृति चराचर विश्व निर्माण करते.

 प्रकृति जड आहे हे खरें, तथापि तिच्यांत चैतन्य दिसतें तें कशाचें ? बुद्धीचे स्वरूप चैतन्यात्मक आहे. चैतन्य हा पुरुषाचा भाव आहे. चैतन्य पुरुषाच्या ठिकाणी वास करतें असें म्हणण्यापेक्षा पुरुष हा चैतन्यात्मक अथवा चित्स्वभाव आहे असे म्हणणे अधिक युक्त होईल. ज्यापासून सर्व ज्ञानाची उत्पत्ति होते, परंतु ज्ञान ज्याला जाणूं शकत नाहीं तें चित् अथवा चैतन्य. जाणीव हा पुरुषाचा स्वभाव नव्हे; कारण जाणीव हे तत्त्वही संघटनात्मक आहे. तें स्वयंभू अथवा एकरूप तत्त्व नाही. तथापि जाणिवेंत जो प्रकाश आणि जी सद्रूपता आहे ती पुरुषाची आहे. चित् पुरुषाच्या ठिकाणी आहे; पण पुरुष ज्ञानयुक्त आहे अथवा तो जाणतो असे म्हणता येत नाही. पुरुषांतील चिदंश प्रकृतीशी मिळून आपणाभोंवतीं दिसणारे हे सारें चराचर विश्व निर्माण झाले आहे. विश्वांत में कांहीं आनंदमय, सुखमय आणि प्रकाशमय आहे, त्याला ते गुण पुरुषापासून प्राप्त झाले आहेत. जे काही सुखमय आहे आणि जे काही कल्याणमय आहे त्यांत त्या अनंताचा अंश आहे. या अनंतरूपालाच आपण परमेश्वर असेंही म्हणतों. “ यद् यद् विभूतिमत् सत्वं श्रीमदूर्जितमेव वा। तत्तदेवावगच्छ त्वं मम तेजोंशसंभचम् ॥ ” हे सारे विश्व याच परमेश्वराकडे अथवा पुरुषाकडे धाव घेत आहे. सारे विश्व त्याकडे ओढले जात आहे. विश्वाचा लेप जरी पुरुषाला लागू शकत नाही अथवा विश्वाशी त्याचा कांहीं प्रत्यक्ष संबंध नाहीं तरी तो साऱ्या विश्वाला आपणाकडे ओढीत आहे. एखाद्या मनुष्याचे चित्त सोन्याकडे सारखें ओढ घेतें असें आपण पाहतो. त्याच्या या क्रियेंतही त्याचे लक्ष्य पुरुषाकडेच वस्तुतः वेधलेले असते. त्या सोन्याच्या ठिकाणी पुरुषाचे जें तेज त्याला दिसते, त्याकडे त्याचे लक्ष्य लागलेले असते. हे तेज सोन्याच्या