पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/६०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

खंड ] सांख्यविचार. ५५

न्यविहीन कोटींतील आहेत. तथापि आरसा स्वतः प्रकाशरूप नसतांही सूर्याला ज्याप्रमाणे प्रतिबिंबित करू शकतो, त्याचप्रमाणे या वस्तू स्वतः जड असतांही चैतन्य प्रतिबिंबित करू शकतात. ज्याचे चित् म्हणजे चैतन्य या वस्तू प्रतिबिंबित करतात, त्याला पुरुष असें नांव सांख्यशास्त्राने दिले आहे. हा पुरुष या साऱ्या वस्तूंच्या पलीकडचा आहे. ज्या अनेक घडामोडी होऊन विश्व दिसू लागले त्यांचे अधिष्ठान पुरुष आहे. त्याच्या अस्तित्वावांचून या घडामोडी होणे शक्य नाही. या दृष्टीने या घडामोडींचें कारण पुरुष आहे असे म्हणता येईल. तथापि या घडामोडी पुरुष आपण होऊन करतो असें मात्र नव्हे. त्या फक्त त्याच्या साक्षित्वाने घडतात. पिंडाच्या ठिकाणी जो पुरुष म्हणवितो तोच ब्रह्मांडांतील परमेश्वर होय. व्यष्टिरूपांतील पुरुष तोच समष्टिरूपांत परमेश्वर. परमेश्वराने आपल्या इच्छेने हे विश्व निर्माण केलें असें म्हणतात; आणि केवळ सामान्य मनुष्यांच्या दृष्टीने सामान्य मनुष्यांकरितां बोलावयाचे म्हटले तर यांत वावगे असेंही कांहीं नाहीं; पण ही ग्राम्य दृष्टि सोडून आपण शास्त्रीय दृष्टीने पाहूं लागलों म्हणजे हे म्हणणे सर्वथा चुकीचे आहे असे आपणास आढळून येईल. इच्छेच्या अंगी निर्माण करण्याचे सामर्थ्य कसे असेल ? इच्छा हे तिसऱ्या अथवा चवथ्या अवस्थेचे तत्त्व आहे; याचा विचार आपण पूर्वी केलाच आहे. इच्छा जन्मास येण्यापूर्वी प्रकृतीची आणखीही रूपांतरें अगोदरच झालेली असतात. मग या रूपांतरांना कोणी जन्म दिला ? इच्छेतून ही उद्भवली असे म्हणणे म्हणजे मुलाने बापाला जन्म दिला असे म्हणण्यासारखेच आहे. इच्छा ही स्वयंभू नाही. ती एकरूप नाही. अनेक घटकांच्या संघाताने ती निर्माण झाली आहे; आणि अशा रीतीनें जो पदार्थ संघटित असतो तो प्रकृतींतून निर्माण झालेला असतो. असा पदार्थ आणि प्रकृति यांच्यांत जन्यजनकभाव असतो. प्रकृति हा जनक आणि पदार्थ हा जन्य होय. याकरिता पदार्थाने प्रकृतीला जन्म दिला हे म्हणणे खरें असण्याचा संभवच नाही. याकरितां परमेश्वराने आपल्या इच्छेतून हे विश्व निर्माण केलें हे म्हणणे अशास्त्रीय आणि चुकीचे आहे. हे शब्द केवळ अर्थशून्य बडबडच होय. आपल्या जाणिवेचा लहानसा भाग मात्र इच्छेत अंतर्भूत होऊ शकतो. जाणिवेचा सबंध विस्तार इच्छेच्या कक्षेत येऊ शकत नाही. जाणिवेचा अंश