पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/५६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

खंड] सांख्यविचार. ५१

आहे असे त्यांचे म्हणणे आहे. असो. या बाबतीतही त्यांचे डोळे लवकरच उघडतील व ही आपली उपपत्ति सर्वथा चुकीची आहे असे ते म्हणूं लागतील.या वंशपरंपरागत ठेव्याच्या उपपत्तीवर शास्त्रीय घणाचे घाव आजच पडूं लागले आहेत. ही उपपत्ति चुकीची आहे असे काही जर्मन पंडित म्हणूं लागले आहेत. ही वंशपरंपरेची उपपत्ति अंशतः मात्र खरी आहे. ती पूर्ण नाही. ती फक्त देहाच्या रचनेपुरती मात्र खरी आहे. मनोभूमिकेच्या रचनेशी वंशपरंपरेचा संबंध नाही. तो देहाच्या आकारापुरताच आहे. प्रत्येक मनुष्याची परिस्थिति दुसऱ्याच्या परिस्थितीहून भिन्न असते असे आपण पाहतो. बापाच्याहून मुलाची परिस्थिति वेगळी, आणि त्याच्याहून त्याच्या मुलाची आणखी निराळी. या तिघांच्या मनोभूमिका जर त्यांस वंशपरंपरेनें प्राप्त झाल्या होत्या तर त्यांच्या परिस्थितीत म्हणजे त्या मनोभूमिकांच्या व्यक्तदशेत इतका फरक कोठून आला? जें एकच कार्य या स्वरूपाने आपणासमोर आपणास दिसत असते, त्या पाठीमागे अनेक कारणांची परंपरा हजर असते. आपल्या वर्तणुकीतही आपल्या परिस्थितीने बदल होत असतो; आणि ही परिस्थिति आपणच निर्माण केलेली असते. आपण स्वतःच बनविली त्याप्रमाणे आपली परिस्थिति बनली आहे. दुसऱ्या कोणीही ती बनविली नाही आणि तिचा वेढा आपल्याभोंवतीं दिला नाही. पूर्वजन्मी जी जीकर्मे आपण केली त्यांस अनुरूप अशी परिस्थिति आपणास चालू जन्मीं प्राप्त झाली आहे. दारूबाज मनुष्य हळू हळू गलिच्छ आणि हलकट लोकांच्या वस्तीकडे आपोआप ओढला जात असतो यांत नवल काय?
 ज्ञान होणे या क्रियेचा अर्थ आता आपल्या लक्ष्यांत चांगला आला असेल. जुन्या प्रतिमांशी नव्या प्रतिमा ताडून पाहून योग्य खणांत त्यांची योजना करणे याचें नांव ज्ञान प्राप्त करून घेणे. नव्या प्रतिमेचे साम्य जुनीशी निश्चित करणे याचे नांव ज्ञान. नवी प्रतिमा अमुक म्हणून ओळखणे याचे नांव ज्ञान. 'ओळखणे' या शब्दांतच जुन्याशी नवें ताडून पाहणे इतका अर्थ अंतर्भूत होतो. ज्ञान या शब्दाला याहून अन्य अर्थ कांहीं नाहीं. ज्ञान म्हणजे पूर्वसंगति शोधून काढणे इतका अर्थ ग्राह्य ठरला म्हणजे एका वस्तूचें ज्ञान करून घेण्यास तिच्या जातीच्या अनेक वस्तूंच्या परंपरा पाहिल्या पाहिजेत हे म्हणणेही तुम्हांस अग्राह्य वाटणार नाही. उदाहरणार्थ, एक गारगोटी