पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/५५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

५० स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.[ नवम

सल्याशिवाय बाह्य पदार्थाचे ज्ञान तुम्हांस होणे शक्य नाही. मनुष्यप्राणी जन्मास येतो तेव्हां अशा प्रकारचा मोठा साठा बरोबर घेऊनच तो या जगांत अवतरतो. जन्माच्या वेळी मनुष्याचे मन अगदी कोऱ्या कागदासारखें अलिखित असते, हे काही युरोपीय पंडितांचे मत सर्वथा चुकीचे आहे, हे तुमच्या लक्ष्यांत आले असेलच. कारण ज्ञान याचा अर्थच असा की नवी बाह्य प्रतिमा आंतील प्रतिमेशी ताडून पाहणे. पूर्वप्रतिमांचा असा जंगी खजिना आपल्याजवळ अगोदरच तयार असला पाहिजे. तसे नसेल तर साम्य पाहण्याची ही क्रिया करणे आपणांस अशक्य होईल आणि अशा क्रियेच्या अभावी नव्या बाह्य वस्तूचें ज्ञानही आपणास होणार नाही. अशा प्रकारचा कोणताही सांठा बरोबर न आणतां एखादें मूल अगदी कोऱ्या मनाने जन्मास आले आहे अशी कल्पना करा. अशा स्थितीत कोणत्याही पदार्थाचे ज्ञान त्याला होणे शक्य नाही. याकरितां चालू जन्म प्राप्त होण्यापूर्वीच तें मूल अशा प्रकारच्या स्थितीत असले पाहिजे की तेथे त्याला प्रतिमांचा साठा तयार करता यावा. अशा रीतीने त्याच्या ज्ञानाची वाढ एकसारखी होत असली पाहिजे. आमची ही विचारसरणी बाजूस ठेवून दुसरा एखादा नवा रस्ता कोणास दाखवितां येत असेल तर तो त्याने दाखवावा. एक आणि दोन मिळून तीन होतात हे जितकें खरें, तितकेंच प्रतिमासादृश्य हेच ज्ञानाचे बीज आहे हेही खरे आहे. पूर्व प्रतिमांचा सांठा अगोदर तयार असल्याशिवाय नव्या बाह्य वस्तूचे ज्ञान होणे शक्य नाही ही गोष्ट आता कित्येक पाश्चात्य पंडितांसही पढू लागली आहे. मूल जन्मास येतें तेव्हां पूर्वज्ञानाचा सांठा त्याच्याबरोबर असतो असें तेही म्हणू लागले आहेत; तथापि त्यांच्या उपपत्तीची परंपरा मात्र वेगळी आहे, हा फरक लक्ष्यात ठेवण्यासारखा आहे. या नव्या मुलाने पूर्वज्ञानाचा साठा बरोबर आणला हे खरे; पण हे ज्ञान त्याच्या स्वतःच्या पूर्वपरिश्रमाचे फळ नसून तें त्याला त्याच्या बापदाद्यांकडून प्राप्त झालेले असते. त्याच्या पूर्वजांनी आपल्या हयातीत जो अनुभवांचा सांठा जमविलेला असतो तो सारा या नव्या गृहस्थाच्या स्वाधीन ते करतात, आणि अशा रीतीने देहदानाबरोबर अनुभवदानही ते त्याला करीत असतात, अशी या पंडितांची विचारसरणी आहे. त्या मुलाबरोबर आलेले ज्ञान हा वंशपरंपरागत प्राप्त झालेला ठेवा