पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/५३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

४८ स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.[नवम

इतकी अचूक नाही. ती स्खलनशील आहे. ती वारंवार चुका करते, पण तिचे क्षेत्र विस्तृत आहे. उपजत बुद्धीच्या कार्याप्रमाणे तिचे कार्य अचूक आणि तडफेचे नाही. कोणत्याही परिस्थितीचा विचार उपजत बुद्धि जितक्या लवकर करते तितक्या जलदीने हे कार्य विचारवती बुद्धि करीत नाही. तिची गति मंद आहे. हिलाच विवेचक बुद्धि (reason ) असेंही नांव आपण देतो. विवेचक बुद्धि स्खलनशील आणि मंदगामी तथापि विस्तृत क्षेत्रावर वावरणारी असून उपजत बुद्धि अचूक आणि तडफेची तथापि ठरीव आणि आकुंचित क्षेत्रावर फिरणारी आहे. उपजत बुद्धीपेक्षां विवेचक बुद्धीच्या हातून अधिक चुका होण्याचा संभव आहे. आता या दोहोंहून वरचढ अशा स्वरूपाची जी बुद्धीची स्थिति ती विचारातीत बुद्धि होय. ही स्थिति फक्त योग्यांसच प्राप्त होणारी आहे. बुद्धीची विशेष प्रकारची आराधना ज्यांनी केली असेल त्यांनाच ती प्राप्त होईल. विवेचक बुद्धीप्रमाणे ती स्खलनशील नाही, इतकेच नव्हे तर तिचें कार्यक्षेत्र विवेचक बुद्धीच्या कार्यक्षेत्राहून फारच विस्तृत आहे. बुद्धीची सर्वांत जी अत्युच्च दशा ती हीच होय.
 या एकंदर विवेचनाचा मुख्य मथितार्थ लक्ष्यांत ठेवावयाचा तो हाच की आपणांसमोर जें जें कांही दिसते, त्या साऱ्याची उत्पत्ती महत् या तत्त्वापासून झाली आहे. विचाराक्षमता (sub-consciousness), विचारप्रवणता (consciousness) आणि विचारातीतता ( super-con- ciousness) या जाणिवेच्या तीन अवस्थांचा अंतर्भाव महत् या एकाच तत्त्वांत होतो, आणि एकच तत्त्व अनेक रूपांनी प्रकट होतें.
  आतां यापुढे एका फारच नाजुक प्रश्नाचा विचार आपणास करावयाचा आहे. हा प्रश्न अनेकांकडून आणि वारंवार उपस्थित होत असतो. हा प्रश्न असाः-स्वतः सर्वस्वी परिपूर्ण अशा परमेश्वराने जर हे जग उत्पन्न केले तर त्यांत सर्वत्र अपरिपूर्णता कोठून उत्पन्न झाली. यांत अनेक प्रकारच्या उणिवा आहेत ही गोष्ट कोणासही नाकबूल करता यावयाची नाही. कारण ती गोष्ट प्रत्येकाच्या प्रत्यक्ष अनुभवाची आहे.
 ज्याला आपण विश्व या संज्ञेने ओळखतो त्याचे स्वरूप काय ? आपल्या जाणिवेत जे काही येते आणि तिला ज्याचा अनुभव होतो त्याला आपण विश्व असे म्हणतो. आपल्या विचारप्रवण स्थितीच्या पलीकडे काय आहे याचे ज्ञान