पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/५०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

खंड] सांख्यविचार. ४५

तत्वज्ञानाचा पाया सांख्यानेच रचिला. पुढे जो ईश्वरवादी पंथ निघाला त्यानेही सांख्यशास्त्राचा आश्रय केला. सांख्यशास्त्राच्या उत्पत्तीनंतर त्याच्या दोन शाखा झाल्या. यांपैकी एक यूरोपांत गेली व दुसरी हिंदुस्थानांत राहिली. हिंदुस्थानांत राहिलेली शाखा श्रीव्यासांनी वाढीस लाविली. शुद्ध बुद्धीला प्रमाण करून तत्त्वज्ञानाचा विचार करणारे पहिलें दर्शन सांख्य हेच होय. यापूर्वी तत्त्वज्ञानाचा विचार सोपपत्तिक व विवेचक बुद्धिपूर्वक कोणीही केला नाही. सांख्य हे जगांतील पहिले दर्शन आहे. याकरिता प्रत्येक इंद्रियातीत विज्ञानजिज्ञासूनें श्रीकपिलांच्या चरणी प्रथम नमन केले पाहिजे. तत्त्वज्ञानाचे आद्यजनक या नात्याने कपिलांची योग्यता फार मोठी असल्याने त्यांचे ह्मणणे अत्यादरपूर्वक ऐकून घेणें आपलें कर्तव्य आहे, हे आपल्या चित्तावर तुम्हीं बिंबवून ठेवावें. पद्धतशीर तत्त्वज्ञानाच्या या आद्यजनकाचा उल्लेख श्रुतींनी केला आहे व भगवान श्रीकृष्णांनी ' सिद्धानां कपिलो मुनिः ' असें म्हणून त्यास अवतारी विभूतीत गोंविले आहे. कपिल महामुनि अंतर्ज्ञानी होते हे समजण्यास याहून दुसऱ्या वेगळ्या पुराव्याची जरूर काय आहे ? योग्यांना अतींद्रिय ज्ञान प्राप्त होते, व तें प्राप्त करून घेण्याच्या कामी कोणत्याही देहाबाहेरील कोणत्याही प्रकारच्या उपकरणांची जरूर लागत नाही, अशी प्रसिद्धि आहे. ही गोष्ट खरी असली पाहिजे हे अशा प्रकारच्या उदाहरणांवरून निःसंशय सिद्ध होतें असें म्हणण्यास हरकत नाही. भगवान् कपिलांपाशी दुर्बिणी नव्हत्या आणि सूक्ष्मदर्शक कांचाही नव्हत्या. तथापि सूक्ष्मातिसूक्ष्म पदार्थ करतलामलकवत् त्यांना दिसले. विश्वाचे त्यांनी केलेले पृथक्करण किती पूर्ण, निर्व्यंग आणि चकित करून सोडणारे आहे पहा !
 सुप्रसिद्ध जर्मन दर्शनकार शॉपेनहॉर यांची पद्धति आणि भारतीय तत्त्वविचारसरणी यांत काय फरक आहे याचे दिग्दर्शन केल्यास तें वावगें होणार नाही. इच्छा हे जगाचे आदिकारण आहे असें शॉपेनहॉर , यांचे म्हणणे आहे. ' जगावें ' ही जी इच्छा वस्तुमात्राच्या ठिकाणी निदर्शनास येते तीच या जगाचे कारण आहे. या इच्छेमुळेच जग आकाराला आले असे ते म्हणतात; पण ही त्यांची उपपत्ति आम्हांस मान्य नाही. इच्छा ही संज्ञावाहक ज्ञानतंतूच्या अधीन आहे. कोणत्याही पदार्थावर माझी दृष्टि