पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/४९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

४४ स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ. [ नवम

होतो तो महत् हा होय. पुढे या महत् तत्त्वाचे रूपांतर होऊन त्यांतून समष्टिरूप अहंकार निघतो. यापुढे तिसरा पदार्थ समष्टिरूप ज्ञानेंद्रिये आणि समष्टिरूप महाभूतें. डोळे, कान, नाक, त्वचा इत्यादिकांच्या द्वारे यांचे ज्ञान आपणास होते. याच महाभूतांपासून पुढे सारे सृष्ट स्थूल पदार्थ निर्माण होतात. विश्वरचनेचा प्रकार सांख्यशास्त्राने या प्रकारें वर्णिला आहे. आणि ज्या प्रकारच्या घडामोडींनी ब्रह्मांडरचना होते, त्याच प्रकारच्या घडामोडी पिंडरचनेंतही दिसून येतात. विश्वरचनेचा जो क्रम तोच पिंडरचनेचा अथवा व्यक्तिरचनेचा. उदाहरणार्थ एक मनुष्यप्राणीच घ्या. मनुष्यरचनेंतही प्रथम अव्यक्त विश्वाचा अव्यक्त अंश असतो. ही त्याची प्रकृति होय. या प्रकृतीतून प्रथम महत् हे तत्त्व निर्माण होते. ब्रह्मांडांतील महत् आणि एका मानवी प्राण्यांतील महत् यांत गुणधर्मांचा फरक मुळीच नाही. त्यांतील फरक एवढाच की ब्रह्मांडांतील महत् विशाल असून पिंडांतील महत् अल्प असते. ब्रह्मांडाप्रमाणेच या एका पिंडांतही महत् तत्त्वापासून अहंकार निर्माण होतो. या अहंकारांतून पुढे इंद्रियें बनतात, आणि अखेरीस त्यांचे जड शरीर बनते. ही सारी परपंरा पूर्णपणे लक्ष्यांत येणे अत्यंत आवश्यक असल्यामुळे तिचे पुनःपुन्हां चर्वितचर्वण करणे भाग आहे. कारण साऱ्या सांख्यशास्त्राचा मूळ पाया हा आहे. पाया कच्चा राहिला तर पुढील इमारतीस धोका येईल. याकरिता हा पाया पक्का करण्यास कितीही मेहनत पडली तरी ते श्रम अनाठायीं गेले नाहीत हे लक्ष्यांत ठेवा. या परंपरेचा उपयोग तुम्हांस सांख्य शास्त्रापुरताच आहे असेंही नाही. साऱ्या जगांत जितक्या म्हणून तत्त्वज्ञानाच्या सरण्या आज उपलब्ध आहेत त्या सर्वांच्या पायाशी हीच परंपरा आहे. श्रीकपिलांच्या तत्त्वविचारांचा उपयोग जीत झाला नाही अशी एकही तत्त्वज्ञानपद्धति आज अस्तित्वात नाही. याकरितां कोणत्याही तत्त्वपद्धतीचा अभ्यास तुम्हांस कर्तव्य असला, तरी प्रथम सांख्यशास्त्र ध्यानांत घेणे फार आवश्यक आहे. जगांतील प्रत्येक तत्त्वपद्धतीने आपल्या विचारसरणीत काहींना काही भाग भगवान् कपिलांपासून उसना घेतला आहे. या दृष्टीने जगांतील सारे पंडित कपिलांचे ऋणी आहेत. हिंदुस्थानांत येऊन पायथागोरास याने सांख्यशास्त्राचा अभ्यास केला. ग्रीक तत्त्वज्ञानाचा आरंभ अशा रीतीने झाला आहे. यानंतर अलेक्झांड्रियन्