पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/४८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

खंड) सांख्यविचार. ४३.

प्रकार आहेत. ज्ञानेंद्रिये आणि कर्मेंद्रियें. इंद्रियें म्हणजे जड देहावर डोळे, कान वगैरे दिसणारी इंद्रिये नव्हत. तर या जड इंद्रियांच्या पाठीमागे त्यांचे जे गोलक मेंदूत असतात त्यांस इंद्रिये अशी संज्ञा आहे. अहंकाराचे रूपांतर होऊन त्यांतून हे गोलक निर्माण होतात. याच अहंकारांतून दुसऱ्याही एक प्रकारचा पदार्थ निर्माण होतो. तो पदार्थ तन्मात्रा या संज्ञेने ओळखला जातो. तन्मात्रा म्हणजे स्थूल वस्तूंचे सूक्ष्म परमाणू. या तन्मात्रा आपल्या नेत्रादि इंद्रियांवर आदळून तेथे जाणीव उत्पन्न करतात. या तन्मात्रांचें अस्तित्व जड इंद्रियांनी जाणतां येत नाही; तथापि तें जाणिवेंत येते. या तन्मात्रांतून जडवस्तू निर्माण होतात. जमीन, पाणी इत्यादि ज्या ज्या वस्तू आपण प्रत्यक्ष पाहू शकतों अथवा ज्यांचा स्पर्श प्रत्यक्ष आपणास घडतो त्या साऱ्या वस्तू या तन्मात्रांतूनच निर्माण झाल्या आहेत. या सर्व गोष्टी आपण विशेषेकरून लक्ष्यांत ठेवाव्या. ही सारी परंपरा लवकर समजण्याजोगी नाही, ही गोष्ट खरी, तथापि खटपटीने ती समजावून घेणे इष्ट आहे. विशेषतः पाश्चात्य लोकांना तर ही अडचण अधिकच प्रखर भासेल; कारण मन आणि स्थूल पदार्थ यांजबद्दल पाश्चात्त्यांत फारच विचित्र कल्पना पसरल्या आहेत. या पूर्वकल्पना समूळ टाकून देऊन त्या जागी या नव्यांची स्थापना करणे हे मोठे कठीण काम आहे. पाश्चात्त्य लेखकांचे संस्कार माझ्या लहानपणी माझ्या चित्तावर झाल्यामुळे या वेडगळ कल्पना माझ्याही डोक्यांत शिरल्या होत्या व त्यांचे उच्चाटन करणे मला फारच जड गेले.
 ही तत्त्वे आणि या साऱ्या घडामोडी विश्वमय आहेत हे लक्ष्यात ठेवलें पाहिजे. हे सारे विश्व दृश्य स्वरूपांत नसून अव्यक्तरूपांत आहे अशी कल्पना करा. अशा स्थितीत यांतील कोणत्याही पदार्थाला स्थूल रूप प्राप्त झालेले नसून तो आपल्या मूळच्या म्हणजे अव्यक्त अथवा सूक्ष्मरूपांत असतो. अशा स्थितीत कोणतीही घडामोड अथवा अदलाबदल होत असतां सर्व वस्तूंचा समूह एकाच केंद्रांत ग्रथित झालेला असतो. या सर्व वस्तू या वेळी एकरूप असतात. साऱ्या वस्तूंचे मूळरूप हेच. पुढे याच रूपांत घडामोड सुरू होते, आणि या एकरूपांतून अनेक पदार्थ निर्माण होतात. दुधांतून ज्याप्रमाणे दही, ताक, लोणी, तूप इत्यादि पदार्थ निर्माण होतात तसेंच हे आहे. या विश्वरूपांत पहिली घडामोड होऊन जो पहिला पदार्थ उत्पन्न