पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/४७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

४२ स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ. [ नवम

असल्यामुळे तिच्या पोटांत जाणीवाक्षमता, जाणीव आणि जाणीवातीतता या तिन्ही अवस्थाचा अंतर्भाव होऊ शकतो. जाणीवाक्षमता (subconsciousness) म्हणजे जेथें जाणीव उत्पन्न होण्याची पात्रता नाही अशी स्थिति. दगडाची अवस्था अथवा बेशुद्धीची अवस्था ही या प्रकारची म्हणता येईल. जाणीव (consciousness) म्हणजे सामान्य ज्ञानाची स्थिति; आणि जाणीवातीतता (superconsciousness) म्हणजे समाधीची स्थिति. याकरितां या अवस्थात्रयापैकी कोणत्याही एका शब्दानें महत् या शब्दांतील सारा अभिप्रेत अर्थ व्यक्त होऊ शकणार नाही. उदाहरणार्थ, सृष्टींत अनेक प्रकारच्या घडामोडी प्रत्यही चालू असतात. यांतील काही तुमच्या डोळ्यांनी तुम्हांस पाहतां येतात आणि त्यांची घडामोड तुमच्या जाणिवेच्या कक्षेत येऊ शकते. पण दुसऱ्या कांही घडामोडी इतक्या सूक्ष्म असतात की तुमच्या पंचेंद्रियांपैकी कोणत्याही इंद्रियांच्या साहाय्याने त्यांचे अस्तित्व तुम्हांस जाणतां येत नाही. या दोन्ही प्रकारच्या घडामोडींचें मूळ एकाच ठिकाणी आहे. या दोन्ही घडामोडींचे कारण महत् हेच आहे. महत् तत्त्वांतून विश्वव्यापी अहंकार निर्माण होतो. महत् आणि अहंकार हेही जड पदार्थच होत. मन आणि स्थूल स्वरूपाची वस्तु यांत गुणधर्ममूलक फरक कांहींच नाही. ज्या मूल वस्तूपासून मनासारखा सूक्ष्म पदार्थ निर्माण होतो, त्याच पदार्थापासून जडवस्तूही निर्माण होतात. त्यांत फरक दिसतो तो कमी अधिक परिमाणाचा मात्र असतो. मूळ पदार्थ तोच असून तो कमी अधिक स्पष्टपणामुळे स्थूळ अथवा सूक्ष्म बनतो. सूक्ष्मांतून स्थूल निर्माण होते. या बाबींतही अर्वाचीन इंद्रियविज्ञानशास्त्र जुन्या मतासच पाठिंबा देत आहे हे मोठे आश्चर्य आहे. सूक्ष्मरूपाचें मन आणि स्थूलरूपाचा मेंदू यांत तत्त्वतः फरक नाही; एवढा मुद्दा तुम्हांला पटला तर तुमची पुष्कळशी खटपट आणि डोकेफोड वांचेल. या गोष्टी आज तुम्हांस प्रत्यक्ष सिद्ध करून दाखवितां आल्या नाहीत तरी त्यांवर तुम्ही खुशाल विश्वास ठेवा. त्यांत तुमचेच हित आहे.
 मूळ अहंकारापासून आणखी दोन प्रकारच्या वस्तू उत्पन्न होतात. अथवा शास्त्रीय भाषेनें बोलावयाचे म्हणजे अहंकार दोन प्रकारची रूपें धारण करतो असेंही म्हणता येईल. एका प्रकारांत इंद्रियें निर्माण होतात. इंद्रियांत दोन