पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/४६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

खंड ] सांख्यविचार. ४१

ज्ञान आतां अशा स्थितीला पोहोंचलें आहे की सध्याच्या काळी वस्तूचा आत्यंतिक नाश-अभाव करता येणे शक्य आहे असें कोणी म्हटले तर त्याची गणना निखालस वेड्यांत होईल. असला समज आता केवळ अक्षरशत्रु अशा शुद्ध गांवढळ लोकांच्या डोक्यांत असला तर असेल. आमच्या प्राचीन तत्त्ववेत्त्यांनी जी गोष्ट हजारों वर्षांपूर्वी सांगितली तिचाच अनुवाद अर्वाचीन शास्त्रांनी करावा हे नवल नव्हे काय ? पण यांत नवल तरी कशाचें ? जे सत्य आहे ते कोणत्याही काळी अविकृत सत्यच असणार. कोणत्याही सिद्धांताच्या खरेपणाचे हे लक्षणच आहे. तो कालस्थलाबाधित असला पाहिजे. अमक्या काळी अगर अमक्या ठिकाणी मात्र खरा आणि दुसऱ्या एखाद्या ठिकाणीं तो खोटा असे होणे शक्य नाही. असे झाले तर त्याला सिद्धांत हे नांव कसे देतां येईल ?
 सत्यवस्तूच्या शोधासाठी निघालेल्या सांख्यशास्त्राने बाह्यसृष्टीचा विचार सोडून दिला आणि त्याने अंतःसृष्टीत बुडी मारली. त्याने मनाचा अभ्यास केला. मनःसृष्टीचे पृथकरण त्याने केले. या पृथक्करणांत जी तत्त्वरत्ने त्यांच्या हाती लागली, तीच तत्त्वे अर्वाचीन शास्त्रांनी केवळ जड सृष्टीचा अभ्यास करून पुन्हां शोधून काढली. या शोधाच्या दिशा आरंभी भिन्न दिसल्या तरी अशा रीतीने अंती त्यांची एकवाक्यता झाली. ज्या एका मध्यबिंदूपासून ही सूक्ष्म आणि स्थूल सृष्टि निघाली, त्याच बिंदूकडे परत जाण्यास ही दोन्ही शास्त्रे निघाली असल्यामुळे त्यांची गांठ अखेरच्या मुक्कामावर पडावी हे रीतसरच आहे.
 प्रकृति व्यक्तदशेस येण्यास सुरवात झाली तेव्हा तिचे पहिले रूप व्यक्त झाले. त्याला महत् असें नांव सांख्यांनी दिले आहे. सामान्य भाषेत याला आपण बुद्धि या नावाने ओळखण्यास हरकत नाही. प्रकृति अमूर्त रूपांतून मूर्तरूपांत यावयास निघाली तेव्हां महत् हे पहिले तत्त्व ती प्रसवली. महत् म्हणजे विश्वव्यापी बुद्धि. महत् याचा अर्थ स्वतःची जाणीव असा करतां येणार नाही. असा अर्थ करणे चुकीचे होईल. कारण जाणीव ही या महत्त त्त्वाचा एक अंश मात्र आहे. महत् हे विश्वव्यापी तत्त्व आहे. जाणीव ही व्यक्तिव्यापी आहे. महत् ब्रह्मांडव्यापी आहे, आणि जाणीव पिंडव्यापी आहे. महत् हे समष्टिरूप असून जाणीव ही व्यष्टिरूप आहे. महत् सर्वव्यापी