पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/४५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

४० स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ. [ नवम

दुसऱ्या ईथरने भरली असेल असे मानले, तर या दुसऱ्या सूक्ष्म ईथरच्या दोन परमाणूंत पहिल्याप्रमाणेच मोकळी जागा अथवा शुद्ध पोकळी राहणार. ही पोकळी कोणत्या पदार्थाने भरली असेल अशी कल्पना करावी? तिच्यासाठी तिसरा ईथर मानावा तर तीच अडचण पुन्हा येणार आणि मारुतीच्या शेपटाप्रमाणे वाढणाऱ्या या ईथरपरंपरेला शेवट असा कधी येणारच नाही, आणि ही परंपरा वाढवितां वाढवितां अखेरीस हाती शून्यलब्धि मात्र राहील. याकरितां सर्व वस्तूंचे आदिरूप परमाणु हे आहे असे म्हणता येत नाही. सांख्यमताप्रमाणे प्रकृति अथवा अव्यक्त हे अखिल दृश्य विश्वाचें आदिरूप आहे. या अव्यक्तरूपांत विश्वांतील यच्चयावत् पदार्थ कारणरूपाने अथवा बीजरूपाने असतात. कारण म्हणजे काय ? कारण म्हणजे व्यक्तरूपाचें अत्यंत सूक्ष्म स्वरूप. व्यक्तदशेला आलेल्या मोठ्या पदार्थाचे अत्यंत आकुंचित अथवा सूक्ष्मरूप तें कारणरूप. जे एका कालीं स्पष्ट आणि विशाल होते तेंच अधिकाधिक आकुंचित होत जाणे याचें नांव कारणरूपास जाणे. नाश म्हणजे काय ? नाश म्हणजे कारणरूपास परत जाणे हा होय. एखाद्या मडक्यावर धोंडा घालून त्याचा चुरा तुम्हीं केला तर त्याचा आपण नाश केला असें तुह्मी म्हणतां. आतां येथें नाश झाला म्हणजे काय झाले ? हेच की त्या मडक्याचे कारणरूप जी माती तिच्यांत ते परत जाऊन मृत्तिकारूप झाले. याचा अर्थ हाच की ज्या कारणांतून वस्तू उत्पन्न होतात त्याच कारणांत म्हणजे प्रकृतीत त्या लीन होतात. नाश म्हणजे आत्यंतिक नाश नव्हे. असा आत्यंतिक नाश शक्यच नाही. शास्त्रीय दृष्टया कोणत्याही वस्तूचा आत्यंतिक नाश होणे शक्य नाही. याकरितां अमुक वस्तु समूळ नष्ट झाली असें म्हणणे अशास्त्रीय, तर्कशून्य आणि वेडेपणाचे आहे. अर्वाचीन शास्त्रपद्धतीने हा सिद्धांत प्रत्यक्ष सिद्ध करून दाखवितां येतो. नाश म्हणजे घटनेची विघटना, हा सिद्धांत भगवान् कपिलांनी कित्येक युगांपूर्वी बोलून दाखविला असून आतां अर्वाचीन शास्त्रे त्याचा अनुवाद करीत आहेत आणि तो सप्रयोग प्रत्यक्ष सिद्ध करीत शाहेत. नाश याचा अर्थ मूळ सूक्ष्मरूपास परत जाणे, इतकाच आहे. नाश म्हणजे पूर्ण अभाव नव्हे. कोणत्याही वस्तूचा पूर्ण अभाव करता येत नाही ही गोष्ट रसायनशास्त्री आपल्या प्रयोगशाळेत दाखवितात हे तुम्हांस ठाऊक असेलच. या बाबतीत आपलें