पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/४४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

खंड ] सांख्यविचार. ३९

सांख्यविचार.

 प्रकृतीला अव्यक्त असें नांव सांख्य तत्त्वज्ञांनी दिले आहे. अव्यक्त म्हणजे सर्व घटकांची साम्यावस्था. अव्यक्तांत जे वेगवेगळे घटक असतात, त्यांपैकी कोणाचे आधिक्य नसतां सर्व समप्रमाण असण्याची जी अवस्था ती प्रकृति अथवा अव्यक्त. सर्व गुणांची पूर्ण साम्यावस्था असेल,अशा वेळी असल्याहि प्रकारची गति असणे शक्य नाही हे उघडच आहे. ज्यावेळी कोणत्याही प्रकारचे व्यक्त रूप प्रकृतीला नसते, अशा अगदी प्रथमावस्थेत कोणत्याही प्रकारची गति नसते आणि अशा वेळी ती अविनाशीही असते; कारण विघटना अथवा मृत्यु यांची उत्पत्ति असमता आणि अदलाबदल यांमुळे होत असते. परमाणुवाद्यांच्या मताप्रमाणे सर्व सृष्टीचें आदिकरण परमाणु हे आहे; पण हे मत सांख्यांना मान्य आहे. परमाणु ही प्रथमावस्था नव्हे असे सांख्यमत आहे. हे विश्व परमाणूंतून उत्पन्न होत नाही. परमाणु ही फार तर द्वितीय अथवा तृतीय अवस्था असे सांख्यांचें म्हणणे आहे. आदिबीजापासून परमाणु उत्पन्न होणे शक्य आहे इतकेंच सांख्यवादी कबूल करतात. आदिबीजापासून परमाणु उत्पन्न होऊन परमाणूच्या कमी अधिक संघटनेने लहानमोठे पदार्थ निर्माण होतात. अर्वाचीन भौतिकशास्त्रांच्या दृष्टीने विचार करतां तीही सांख्यमतालाच अखेरीस पुष्टि देतील असा स्पष्ट संभव दिसतो. त्यांच्या वाढीचा आजचा झोंक सांख्यमताकडेच आहे. ईथर ( Ether ) अथवा आकाश हा मूळ पदार्थ आहे असें अर्वाचीन शास्त्र म्हणतें. ईथर हा अनेक परमाणु मिळून झाला आहे असें म्हणतां येत नाहीं; कारण तसे असेल तर त्यांत दुसरा कोणताही पदार्थ पूर्णपणे मिसळला जाणार नाही. हवा ही अनेक परमाणू मिळून झाली आहे. ईथरचे अस्तित्व सर्वत्र आहे हे आपणांस ठाऊक आहेच. सर्व पदार्थांस ईथर अंतर्बाह्य व्यापून आहे, आणि हवेचे परमाणूही त्यांत तरंगत आहेत. आतां स्वतः ईथरही अनेक परमाणूंचा बनला आहे, असें म्हणावें तर त्यांतील दोन परमाणूंत मोकळी जागा राहणारच. मग ही मोकळी जागा कशाने भरली असेल. ही जागा अधिक सूक्ष्म स्वरूपाच्या