पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/४३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

३८ स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ. [ नवम

या देहांतही आहे. सर्व प्राण्यांची जीवनकला या रूपाने तोच आविर्भूत होत आहे. तोच व्यक्तदशेला येत आहे. हा सूर्य सर्व प्राण्यांना अत्यंत प्रिय आहे, आणि त्याचे प्रेमही सर्व प्राण्यांवर तसेंच आहे. या सूर्याच्या अंतरंगांत में स्वयंप्रकाश ब्रह्म आहे तेंच अंशतः आमच्यांतही परावर्तन करीत आहे. आम्ही सारे लहान लहान आरसे असून त्यांत तोच स्वयंप्रकाश बिंबला आहे ! त्याचे प्रतिबिंब ज्यांत नाही असे कोणतें जीवित आहे ? जीत तो प्रकाशत नाही अशी, कोणती वस्तु आहे ? आमच्या देहांत तेंच स्वयंप्रकाश ब्रह्म आहे आणि त्याच्याचमुळे आमच्या डोळ्यांस प्रकाश पाहण्याचे सामर्थ्य प्राप्त झाले आहे. हा चंद्र सर्व प्राण्यांना प्रिय आहे आणि तोही सर्व प्राण्यांवर प्रेम करतो; पण या चंद्राचा अंतरात्मा में स्वयंप्रकाश ब्रह्म,जै अनंत आणि अमर आहे तेच आमच्या देहांत मन या रूपाने आविकृत होत आहे. ही विद्युत् किती प्रकाशशाली आणि सुंदर आहे पहा ! सर्व प्राण्यांवर तिचे प्रेम आहे आणि सर्व प्राणी तिजवर प्रेम करतात; पण या विद्युत् शक्तीचा अंतरात्मा कोण म्हणाल तर तो तेंच स्वयंप्रकाश ब्रह्म. तेंच स्वयंप्रकाश ब्रह्म आमच्यांतही आहे. कारण 'सर्वं खल्विदं ब्रह्म' मनुष्याचे प्रेम सर्व प्राण्यांवर आहे आणि सर्व प्राणीही मनुष्यावर प्रेम करतात. मनुष्याचा अंतरात्मा म्हणजे तेंच स्वयंप्रकाश ब्रह्म. 'सर्वं खल्विदं ब्रह्म सर्व प्राण्यांचे अधिष्ठान हेच ब्रह्म आहे. "

 हे सारे विचारतरंग किती उदात्त, काव्यमय आणि उपयुक्त आहेत पहा ! हे सारे विचार ध्यान करण्यासाठी आहेत. चित्तांत सदोदित चिंतन करावें अशा योग्यतेचे ते आहेत. फार कशाला, या पृथ्वीचेंच चिंतन तुह्मी करा, आणि त्याच वेळी हेही लक्ष्यात वाळगा की या पृथ्वीच्या अंतरात्म्यांत ज्या स्वरूपाचा वास आहे तेच आमच्यांत वसत आहे. ही पृथ्वी आणि आम्ही ही दोन्ही वस्तुतः एकच आहेत. पृथ्वी ही देह आणि जीवात्मा हाच परमात्मा. पृथ्वीच्या विशाल देहामागे जसा विशाल परमात्मा त्याचप्रमाणे या लहानशा जड देहामागे जीवात्मा आहे. या वायूच्या ठिकाणी में ब्रह्मरूप आहे तेंच मजमध्येही आहे. ही सारी एकाच अनंताची अनेक रूपे आहेत. एकच अनंत ब्रह्म अनेक रूपांनी व्यक्त झाले आहे.