पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/४२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

खंड ] याज्ञवल्क्य आणि मैत्रेयी. ३७

आहे. मनोद्वारा प्राप्त होणारे सुख तोच आणि शुद्ध चैतन्यात्मक परमानंदरूपही तेंच. त्याच्या वांचून कसलेही अस्तित्व शक्य कसे असेल ? हजारों देवदेवतांनी व भुताखेतांनी 'आम्हींच देव' म्हणून परस्परांशी युद्ध करीत राहावें हे शक्य आहे ? ही सारी बालबुद्धीची लेकरें आहेत. बालिशबुद्धीला पडलेली ही स्वप्ने आहेत ! या देवदेवतांना अणि समंधवेताळांना स्वप्नसृष्टीवांचून अस्तित्व नाही. अत्यंत क्षुद्र प्रतीचें शारीरिक सुखही तोच आहे आणि शुद्ध चैतन्यात्मक आनंदही तोच. त्यावांचून दुसऱ्या कोठेही माधुर्य नाही, प्रेम नाही आणि आनंदही नाही.” हे महर्षि याज्ञवल्क्यांचे वचन आहे. अशा प्रकारची स्थिति जेव्हां तुह्मांस प्राप्त होईल व सर्वत्र एकच रूप पाहण्याची समदृष्टि मिळेल त्याच वेळी आनंद म्हणजे काय हे तुह्मांस सत्यत्वाने कळेल. दारुबाजाला दारूच्या घुटक्यांत जें सुख मिळतें तेंही हे एकरूपच आहे असें तुह्मांस दिसूं लागेल-तेव्हांच शांति या शब्दाचा खरा अर्थ तुम्हांस कळेल. त्याच वेळी सत्यवस्तूशी तुमची भेट होईल. प्रेम ह्मणजे काय हे तुम्हांला अशा स्थितींतच कळेल; आणि जोपर्यंत या खोट्या भेदांना आणि मूर्खपणाच्या कल्पनांना तुझी मिठी मारून बसाल तोपर्यंत सर्व प्रकारची दुःखें तुम्हांस शोधीत येतील. तो एकच अनंत, तो एकच स्वयंप्रकाश या दृश्याच्या पोटांत आहे. या पृथ्वीच्या पोटांत त्याचीच वस्ती आहे. जगांत जेथे जेथें कांही प्रेम म्हणून आढळून येतें तेथें तेथें तें स्वरूप त्याचंच आहे. देहाच्या ठिकाणी दिसून येणारे प्रेमही तोच. पृथ्वी ही जणूं काय त्याचा देह आहे. या देहाच्या आंत सर्व प्रकारच्या शक्तींचा वास आहे. या देहांत अनेक प्रकारची सुखसाधनें भरली आहेत. या साऱ्या शक्ती आणि सुखसाधनेही तोच आहे. डोळे पाहण्याची क्रिया करतात, त्वचा स्पर्श जाणूं शकते. या साऱ्या साधनांचा अर्थ काय ? ही साधनेंही तोच आहे. देहाच्या आंतील स्वयंप्रकाश आत्मा आणि त्याची ही साधने यांत भिन्नता नाही. प्राण्यांना सर्व प्रकारें आश्रय देणारी ही पृथ्वी आणि तिच्यावर प्रेम करणारे हे प्राणी ही सर्व तोच आहे. तो अनंतच जगांतील आनंद आहे. आपणांमध्येही प्रत्ययास येणारा आनंद तोच आहे. तोच ब्रह्म. “ हा वायु सर्व प्राण्यांना प्रिय आहे आणि त्याचेही प्रेम सर्व प्राण्यांवर आहे. हा वायु ब्रह्मरूप आहे. या वायूच्या ठिकाणी में स्वयंप्रकाश ब्रह्म आहे तेंच आमच्या