पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/४१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

३६ स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ. [नवम

यांतून आपणास दिसलें म्हणजे त्या पडद्याच्या पातळपणाच्या परिमाणानुरूप त्याला आपण बरें, मध्यम, चांगलें अशी नांवें देतों; आणि त्याच रूपासमोर जाड पडदा असला म्हणजे त्याचे रूप अत्यंत अंधुकपणे आपल्या प्रत्ययास येते आणि त्यालाच आपण वाईट म्हणतों. चांगले आणि वाईट या दोन प्रकारच्या दोन समजुती अथवा भावना आहेत. या समजुती द्वैत बुद्धीमुळे उत्पन्न झालेल्या आहेत. द्वैत दिसणे हेच पहिले खूळ आहे. या खुळाने आपल्या मनाला एकवार पछाडले की तेथे दुसरी लहान मोठी अनेक खुळे निर्माण होतात. या खुळांपासून अनेक प्रकारची शब्दसृष्टि निर्माण होते. ही सृष्टि मनुष्याच्या हृदयांत वास करते. आणि अखेरीस त्याच घराचे स्वामित्व पटकावून वाटेल तसा धिंगाणा ती तेथें घालू लागते. मग ती कोणाला क्रूर पशु बनविते, कोणाच्या हृदयांत द्वेषाची रोपे लावते, आणि कोणाच्या मनांत मत्सराचे बीज पेरते. बरें आणि वाईट या दोन कल्पना आपल्या बाल्यावस्थेपासूनच आपणास पछाडीत असतात; आणि मूर्खत्वाच्या कल्पनांतून पुढे मत्सरादि विकार निर्माण होऊन आपल्या जन्माचें मातेरे करून टाकतात. मनुष्यजातीबद्दलच्या आपल्या साऱ्या कल्पना विकृत होतात, आणि या स्वर्गरूपी जगाला नरकाचे रूप आपण प्राप्त करून देतो. चांगले आणि वाईट या द्वैताचा नाश ज्या क्षणी आपल्या चित्तांतून होईल, त्याच क्षणीं या पृथ्वीचें रूपांतर स्वर्गात होईल.
 " ही सारी सृष्टि अत्यंत मधुर आहे. ती सर्व प्राण्यांना मधुर आहे व सर्व प्राणी तिला मधुर आहेत. ही सारी परस्परांची पोषक आहेत. या सर्वांत जें माधुर्य आहे तें आत्म्याचे आहे. तें माधुर्य तोच आहे. तो स्वयंप्रकाश असून अनंत आहे. या जगाच्या पोटी त्याची वस्ती आहे. हे माधुर्य कोणाचे ? त्या अनंत रूपावांचून माधुर्य कोठचे ? तें एकच माधुर्य अनेक रूपांनी विलसत आहे. जेथे जेथें थोडें बहुत माधुर्य-प्रेम आढळेल तेथे तेथे तें त्याचंच स्वरूप आहे. तें प्रेम, तें माधुर्य तोच आहे. मग ते प्रेम साधुसंतांच्या ठिकाणी असो, पापी मनुष्याच्या ठिकाणीं असो, देवदूतांच्या ठिकाणी असो, अथवा ते एखाद्या खुनी मनुष्याच्या ठिकाणी असो; तें माधुर्य तोच आहे. तें माधुर्य देहांत असो, मनांत असो अथवा इंद्रियांत असो; तें माधुर्य तोच आहे. देहद्वारा अनुभवास येणाऱ्या आनंदांत त्याचाच वास