पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/३९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

३४ स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ, [ नवम

इतकेच नव्हे, तर त्या भ्रमोत्पादकही आहेत. तथापि अत्यंत क्षुद्र अशा स्फुलिंगांतूनही तेंच अनंत प्रकाशत आहे. प्रत्येक वस्तु ही परमात्मरूपाची व्यक्त दशा होय. ज्ञानाच्या या अत्युच्च शिखरापर्यंत कसे पोहोंचावें ? " प्रथम या आत्मरूपाबद्दल ऐकून घ्या. ” असें याज्ञवल्क्यांनी सांगितले आहे. प्रथम ऐकावयाचे, नंतर विचार करावयाचा आणि अखेरीस त्याचेच ध्यान करावयाचे अशी साधनमालिका याज्ञवल्क्यांनी सांगितली आहे. यानंतर पिंड आणि ब्रह्मांड यांचा विचार त्यांनी केला आहे. पिंड आणि ब्रह्मांड ही परस्परांपासून भिन्न असून आपआपल्या विशिष्ट कक्षांत फिरत असतात असें त्यांनी दाखविले आहे. ते म्हणतात " ही पृथ्वी किती सुंदर आणि प्रत्येक प्राण्यास मदत करणारी आहे पहा ! तसेंच हे सारे प्राणीही जगाचे मदतगार आहेत; पण स्वयंप्रकाश आत्म्याला मात्र कोणाचीही मदत होऊ शकत नाही." जें जें कांहीं कल्याणप्रद-आनंदप्रद म्हणून आहे ते कितीही क्षुद्र असले तरी ते त्या स्वयंप्रकाशाचेंच प्रतिबिंब आहे. चांगले म्हणून जें कांही आहे ते त्याचेंच प्रतिबिंब. हेच प्रतिबिंब छायामय असले म्हणजे त्याला वाईट असें नांव प्राप्त होते. विश्वांत दोन स्वयंप्रकाश वस्तू नाहीत. दोन परमेश्वरांस अस्तित्व नाही. ज्या वेळी एकरूप स्वयंप्रकाशाचे प्रतिबिंब अल्पप्रमाणावर पडते त्या वेळी त्या स्थितीला तमोमय, अंधारमय, दुष्ट, वाईट इत्यादि संज्ञा आपण लावतों. आणि ज्या वेळी हे प्रतिबिंब अधिक स्पष्ट असते, त्या वेळी त्याला आपण तेजोमय, चांगलें, कल्याणप्रद अशी नांवे देतो. चांगले आणि वाईट यांतील वास्तविक फरक इतकाच. चांगले आणि वाईट यांतील फरक गुणांचा नसून कमी अधिक प्रमाणाचा मात्र आहे. या परस्परांत गुणांची अथवा धर्माची भिन्नता नाही. ही दोन्ही एकस्वभावच आहेत. फरक आहे तो प्रतिबिंबाच्या कमी अधिक स्पष्टपणाचा मात्र आहे. याचें प्रत्यंतर पाहण्यास फार लांब जावयास नको. आपल्या चालू जीवनक्रमाचेंच उदाहरण आपण घेऊ. आपल्या लहानपणीं हजारों वस्तू आपल्या नजरेस पडत असतात आणि हजारों वस्तूंना आपण चांगलें म्हणत असतो. पुढे या वस्तू वाईट आहेत असा अनुभव येतो. त्याच प्रमाणे खरोखर चांगल्या वस्तूंना आपण वाईट समजत असतो. आपल्या कल्पनांत अशा प्रकारें केवढे मोठे स्थित्यंतर घडत असते! पूर्वी चांगली म्हणून वाटणारी गोष्ट पुढे