पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/३८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

खंड याज्ञवल्क्य आणि मैत्रेयी. ३३

ऐकून माझें मन भ्रमते. देवदेवतांतरांचे अस्तित्व नाहीसे होईल असे आपण म्हणाला, हे ऐकून माझ्या काळजानें ठाव सोडला आहे. महाराज, अनंताशी एकरूप झाल्यावर माझें ' मीपण ' कोठे राहिलें ? तें राहिले नाहीं म्हणजे मी हरवले असेंच झाले नाही काय? हा अमुक, तो तमुक असें तरी मग कसे ओळखावें? अशा स्थितीत मी प्रेम कोणावर करावे आणि द्वेष तरी कोणाचा करावा? अशा स्थितीत आपलें व माझें काय होणार हे मला काहीच कळत नाही. ” यावर याज्ञवल्क्य म्हणाले, " मैत्रेयी, तुझ्या चित्तांत भ्रम उत्पन्न करावा असा माझा हेतु मुळीच नाहीं, अथवा अशाच भ्रममय स्थितींत तुला ठेवावें अशीही माझी इच्छा नाही. माझ्या भाषणाने तुझ्या चित्ताला कंप सुटला यांत मला नवल वाटत नाही. ज्या ठिकाणी द्वैत आहे, ज्या ठिकाणी एक दुसऱ्याला पाहतो, ज्या ठिकाणी एक दुसऱ्याचे ऐकतो, ज्या ठिकाणी एक दुसऱ्याचे स्वागत करतो, ज्या ठिकाणी एक दुसऱ्याबद्दल विचार करतो आणि ज्या ठिकाणी एक दुसऱ्याला जाणतो त्या ठिकाणी भीति आलीच. पण जेथें सर्वच आत्मरूप होते तेथे कोणी कोणाला पाहावें, कोणी कोणाचें ऐकावें, कोणी कोणाचें स्वागत करावे आणि कोणी कोणाला जाणावें? अशा स्थितीत भीति ही नाहीच. "
 या एकाच सिद्धांताचें ग्रहण करून सुप्रसिद्ध तत्ववेत्ता शॉपेनहार याने आपल्या ग्रंथांत त्याचा अनुवाद केला आहे. या विश्वाकडे आपण पाहतों आणि याला आपण जाणतों; पण हे ज्ञान आपणास कशाच्याद्वारे घडतें ? येथे जाणणारा अथवा ज्ञाता कोण? आणि या ज्ञात्याला कसे ओळखावयाचें ? याला उपाय काय ? कारण त्या ज्ञात्याच्याचद्वारे आणि त्याचे अस्तित्व आहे म्हणूनच हा सारा वस्तुसंघात आपण जाणतों. त्याला जाणण्याला काही साधन आहे काय ? नाहीं; त्याला जाणण्याला एकही साधन आपणास उपलब्ध नाही. कारण तें साधनच तो स्वतः आहे. मग साधनाने साधनालाच कसें जाणावें ? हे साधन जाणून घेणे अगत्याचे आहे.
 विविधरूपाने प्रत्ययास येणारे हे सारे विश्व मूलतः एकरूप आहे हा सिद्धांत याज्ञवल्क्यांनी अशा प्रकार सांगितला आहे. अविभाज्य म्हणजे ज्याचे भाग पाडता येत नाहीत तेंच आपलें खरें रूप होय. आपलें खरें विशिष्टत्व तेंच, या खेरीज बाकीच्या साऱ्या कल्पना क्षुद्र होत. त्या नुसत्या क्षुद्र आहेत