पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/३४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

खंड ] याज्ञवल्क्य आणि मैत्रेयी. २९

असते. त्याप्रमाणे देवदेवतांतरांच्या ठिकाणी असलेली भक्तिही वस्तुतः त्या देवांकरितां नसून स्वतःकरितां असते. केवळ त्या वस्तूकरितांच त्या वस्तूवर कोणीही प्रेम करीत नाही; पण त्याची प्रीति स्वतःवर असते, म्हणूनच त्या वस्तूवर तो प्रीति करीत असतो. याकरितां या आत्मरूपाविषयी प्रथम ऐकून घ्यावे, त्यावर विचार करावा, विवेकबुद्धीने त्या साऱ्या विचारमालिकेची तपासणी करावी आणि नंतर त्याचे ध्यान करावें. आत्मरूपाविषयी श्रवण झाले, त्याचा साक्षात्कार झाला आणि त्याचे प्रत्यक्ष दर्शन झाले म्हणजे या विश्वांत जाणण्याजोगें में कांहीं असेल तें सारे जाणले असे समजावें."
 महर्षि याज्ञवल्क्यांच्या या वचनावरून आपणास काय बोध होतो ? याज्ञवल्क्यांनी एक मोठी चमत्कारिक विचारसरणी आपणापुढे मांडली आहे. प्रेम कितीही मोठे असले तरी त्यांत अत्यंत कमी प्रतीचा स्वार्थ भरलेला असतो असें याज्ञवल्क्य म्हणतात. सारे प्रेम स्वतःवर असतें व परक्यासाठी परक्यावर प्रेम कोणीही करीत नाही असा याज्ञवल्क्यांच्या म्हणण्याचा आशय आहे. मनुष्यप्राणी इतका स्वार्थी असू शकेल काय ? दुसऱ्या कोणत्याही वस्तूवर निःस्वार्थी प्रेम तो करणारच नाही असे इतक्या निश्चयाने म्हणता येईल काय ? याज्ञवल्क्यांचे हे म्हणणे आम्हांस खरेंसुद्धा वाटत नाही. मनुष्याला कोणत्याही कर्माला प्रवृत्त करणारी जर एखादी शक्ति या जगांत असेल तर ती स्वार्थ हीच होय, असें म्हणणारे कांहीं तत्त्ववेत्ते अगदी अलीकडच्या काळीही होऊन गेले आहेत. स्वार्थावांचून कोणीही मनुष्य कोणत्याही कामांत पुढे पाऊल घालणार नाही असे या अर्वाचीन तत्ववेत्त्यांचे मत आहे. हे मत खरे आहे आणि खोटेही आहे. जीवात्मा हे परमात्म्याचे प्रतिबिंब आहे. हे प्रतिबिंब क्षुद्र असल्यामुळेच तें वाईट आणि विरूप दिसतें. आत्म्याच्या ठिकाणी प्रत्येकाचे अपार प्रेम आहे, आणि आत्मा हाच विश्व आहे. विश्वरूपानें तो प्रत्यक्षत्वास आला आहे. हेच अमर्याद प्रेम एखाद्या वस्तूच्या उपाधीमुळे क्षुद्र रूपास आले म्हणजे त्याचे अनंतत्व नाहीसे होते, आणि क्षुद्रपणामुळे तें हिडीस आणि दुष्ट दिसू लागते. विश्वाच्या अत्यल्प अंशांत त्याचे प्रतिबिंबही अत्यल्प प्रमाणावर उमटतें आणि यामुळे तें दुष्टसें भासू लागते. एखादी पत्नी आपल्या पतीवर प्रेम करीत असली तर तें प्रेम त्याच्या देहावर नसून त्यामागील त्याच्या आत्म्यावर