पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/३०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२९६ स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.[ नवम


ज्याला सत्याची भेट हवी असेल, त्याला अध्यासही आवश्यक आहे. गुरूप दिष्ट मार्गाने जाण्याचा हव्यास त्याच्या चित्ताला असला पाहिजे. गुरूने सांगितलेले सत्य प्रत्यक्ष गोचर कसे होईल असा निदिध्यास त्याच्या चित्ताला असावा. अभ्यासाकडे चित्त सदोदित राहून संसारापासून ते परांमुख कर ण्याचा यत्न त्याने सतत केला पाहिजे. ईश्वर दर्शनाची इच्छा कितीहि प्रबळ असली आणि भाग्याने गुरूचीहि प्राप्ति झाली, तरी तुमच्या चित्ताला अध्यास नसेल आणि गुरुपदिष्ट मार्गाचा अभ्यास तुमच्याकडून दृढनिश्चयाने आणि सतत न होईल, तर तुम्हांस आत्मानुभवहि होणार नाही. ही सारी जेव्हां एकवटतील, तेव्हांच तुमचें साध्य सिद्ध होईल.
 तुम्ही उज्वलयश आर्यांचे वंशज आहां. त्यांनी काय केले, हे तुम्ही विसरू नका. आपल्या धर्माने केवढे मोठे साध्य आपणापुढे ठेविलें आहे, हे ध्यानांत आणा. संसारातीत होणे हेच प्रत्येक हिंदूचे ध्येय असले पाहिजे. केवळ ऐहिकाचाच त्याग आपणांस करावयाचा नसून स्वर्गसुखाचीहि इच्छा आपण नाहींशी केली पाहिजे. केवळ दुर्गुणच त्याज्य नसून अखेरीस सद्गुणहि आपणास टाकावयाचे आहेत, हे विसरू नका. अशा रीतीने बरे आणि वाईट या दोहोंच्याहि पलीकडे आपणांस जावयाचे आहे. आपणांस दृश्यजगापली

कडे जावयाचे आहे. 'सच्चिदानंद ब्रह्म' हा आपला अखेरचा मुक्काम आहे.


*************