पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/३००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खंड.] मी काय शिकलों.२९५


असेल, तर तिच्या द्वाररक्षकांच्या कृपेनेंच तुमचे कार्य होईल. गुरु म्हणजे आपले सर्वस्व असें तुमच्या मनाने तुम्हांस सांगितले पाहिजे. तोच उपदेष्टा, तत्त्ववेत्ता, मित्र आणि तोच आपला मार्गदर्शक असें तुम्हांस वाटले पाहिजे. या मार्गात तुम्हांस पुढे पाऊल टाकावयाचे असेल, तर गुरूशिवाय दुसरें गत्यंतरच नाही. हा गुरु कसा असावा याची व्याख्याहि आमच्या प्राचीन पंथाने करून ठेविली आहे 'श्रोत्रियोऽवृजिनोऽकामहतो यो ब्रह्मवित्तमः' तो श्रोत्रिय श्रुतिविद्या पारंगत असावा, तो निष्पाप असावा, निरिच्छ असावा आणि आत्मानुभवीहि असावा. श्रोत्रिय म्हणजे पुष्कळ पठण केलेला इतकाच अर्थ समजू नये. पुष्कळ शास्त्रांचे पठण एखाद्याने केले, तर तेवढ्यानेच श्रोत्रिय ही संज्ञा त्याला प्राप्त होत नाही. ज्याच्या बुद्धीने शास्त्रांच्या रहस्याचें आकलन केले असेल, तो श्रोत्रिय. या रहस्यांचा प्रत्यक्ष व्यावहारिक अर्थ काय आहे, याचा अनुभव आपल्या जीवनचरितांत ज्याने घेतला असेल, तो श्रोत्रिय. तोंडाने अनेक शास्त्रे म्हणणे पण त्यांचे रहस्य न जाणणे, ही पोपटविद्या झाली. अशाला पंडित म्हणता येणार नाही. शास्त्रांतील एखादाहि शब्द जाणून ज्याच्या चित्तांत ईश्वरभक्तीचा कल्लोळ उठत असेल, तोच खरा पंडित. नुसते पुस्तकी पंडित तुमच्या उपयोगी पडावयाचे नाहीत. अलीकडे गुरु फार स्वस्त झाले आहेत. उठला सुटला तो आपणांस गुरु म्हणविण्याची इच्छा करितो. अंगावर चिंध्या पांघरून कवडी कवडी मागत फिरणारा भिकारीहि लक्ष रुपयांचें गोप्रदान सोडण्याची इच्छा करितो. गुरु ही चीज इतकी सोपी नाही. गुरु निष्कलंक असला पाहिजे. तसेंच तो अकामहत म्हणजे कोणत्याहि इच्छेनें घायाळ न झालेला, असा असला पाहिजे. कोणाचेंहि बरें करावें याशिवाय दुसरी कोण तीहि इच्छा ज्याच्या चित्ताला शिवत नाही, तोच अकामहत. ज्याच्या ठिकाणी दया सागरासारखी परिपूर्ण असते; आणि जिच्यात कोणत्याहि कारणाने कधी उणीव येत नाही, तो अकामहत. कीर्तीसाठी, पैशासाठी अथवा दुसऱ्या कोणत्याहि हेतूसाठी आपल्या ज्ञानाचा विक्रय जो कधीहि करीत नाही, तो अकामहत. त्याचप्रमाणे गुरु ब्रह्मनिष्ठहि असला पाहिजे. ब्रह्मनिष्ठ म्हणजे आत्मानुभवी. करतलागवकवत् ज्याला आत्मानुभव झाला असेल, तोच ब्रह्म- निष्ठ. गुरूची व्याख्या श्रुतींनी याप्रमाणे केली आहे. अशा गुरूचा आश्रय तुम्हांस झाला, तरच ईश्वराचे दर्शन तुम्हांस होईल. असा आश्रय मिळाला,

म्हणजे तुमचा मुक्तिमार्ग सुलभ होईल.