पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खंड.] हिंदुतत्त्वज्ञानाचा इंग्लंडावर घडलेला परिणाम. २८५


मानवी मनोरचनेत या एका गुणाला अढळस्थान असले पाहिजे हे आपण कधीहि विसरू नका. हा शब्द अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळेच त्याचा उच्चार मला पुनःपुन्हां करावा लागतो. प्रत्येकाला आत्मश्रद्धा प्रथम पाहिजे. महा सागरांतील एखादा तरंग क्षुद्र वुडबुडा असला आणि दुसरा प्रचंड डोंगर एवढा असला, तरी त्या दोहोंच्या सामान्य अधिष्ठानाच्या जागी तोच महा सागर असतो. त्या दोहोंचे अधिष्ठान सारखेच अनंतरूप असते. याकरिता आपण क्षुद्र म्हणून निराश होण्याचे कोणासहि कारण नाही. मुक्तीचा मार्ग सर्वांस सारखाच मोकळा आहे. आपणांपैकी प्रत्येक जण हे मायावरण आज ना उद्या अवश्य फेकून देईल. याकरितां ही आत्मश्रद्धा नेहमी जवळ असू द्या. केव्हाही निराश होऊ नका. आशा दीर्घ असली म्हणजे दीर्घ प्रयत्नांस ती उत्तेजन देते. आशा जिवंत आहे तोपर्यंत कोणत्याहि गोष्टीच्या सिद्धीसाठी तुम्ही भगीरथ प्रयत्न केल्यावांचून राहणार नाही. मी वाटेल ते करूं शकेन अशी आत्मश्रद्धा आपणांपैकी प्रत्येकाच्या हृदयांत उत्पन्न झाली, तर व्यास आणि अर्जुन यांचा काळ आजहि आपणांस पुनः दिसेल. ज्या काळी सा-या मनुष्यजातीला उपयुक्त अशी तत्त्वरत्ने बाहेर पडली, तो काळ आज पुनः प्राप्त होईल, अध्यात्म विचारांच्या बाबतींत आज आपण फार मागसलेले आहो. अध्यात्म विचारांना वास्तविक हिंदुस्थानांत तोटा नाही. जगांतील सा-या मानवकुलांत हिंदु कुल श्रेष्ठ पदवीला चढले, तें याच ज्ञानाच्या जोरावर चढलें; आणि तेच पूर्वीचे दिवस आजहि आपणांस पुनः प्राप्त करून घेता येण्यासारखे आहेत. आपली पूर्वपरंपरा आणि पूर्वेतिहास यांचे अवलोकन केले, तर अशी आशा बाळगणे अन्याय्य आहे असे कोणीहि म्हणणार नाही. पण असे दिवस येणे अथवा न येणे ही गोष्ट तुमच्या कर्तृत्वावर अवलंबून आहे. बंगाली तरुणांनो, या मार्गात आपणांस काही मदत मिळेल या आशेनें श्रीमंतांच्या आणि थोरामोठ्यांच्या तोंडाकडे केव्हाही पाहूं नका. त्यांच्या हातून अशा प्रकारची कार्ये केव्हाही घडलेली नाहीत. जगांतील सारी महत्कार्ये आजपर्यंत गरीब दुबळ्यांनीच केली आहेत. बंगाल्यांतील अकिंचन तरुणांनो, तुम्हांला अशक्य असे काही नाही. प्रत्येक गोष्ट तुमच्याने होण्यासारखी आहे आणि ती तुम्हीं केलीच पाहिजे. तुम्ही एकवार पुढे पाऊल टाकले की शेकडों अनुयायी तुमच्या मागे धावत सुटतील. तुम्ही गरीब आहां, दुबळे आहां, असा