पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

२४ स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ. [नवम

त्याने केला पाहिजे. जडशरीराचा नव्हे, तर जीवात्म्याचा अभ्यास त्याने केला पाहिजे. श्रुतींनी असा अभ्यास केला तेव्हां या मोठ्या प्रश्नाचे उत्तर त्यांस सांपडले. या जडदेहाच्या आणि मनाच्याही मागें स्वयमेव आत्म्याचा वांस आहे हेच तें उत्तर. हा आत्मा स्वयंभू आहे. तो कधी जन्मास येत नाही आणि मरतही नाही. तो स्वयमेव आत्मा सर्वव्यापी आहे. त्याला कोणताही विशिष्ट आकार नाही यामुळे हे सारे दृश्य त्याने व्यापलें आहे. ज्याला कोणताही विशिष्ट आकार नाही आणि दिक्कालादिकांनी जें बद्ध नाही तें अमुक एका विशिष्ट स्थळी असेल असे म्हणता येणे शक्यच नाही. तें सर्वत्र आहे. तुम्हां आम्हांमध्येच नव्हे तर यच्चयावत् सृष्टींत ते अंतर्बाह्य व्यापून राहिले आहे.
 जीवात्म्याचे स्वरूप काय आहे ? ईश्वर या नांवाचा एक निराळा प्राणी असून असंख्य जीवात्मे त्यापासून भिन्न आहेत व ते अखेरपर्यंत भिन्नच राहावयाचे असें म्हणणारा पक्ष प्राचीनकाळापासून आपणास आढळतो. या पक्षाच्या मते परमेश्वर स्वभावतःच जीवात्म्यापासून भिन्न आहे. या दोहोंचे घटकच मुळांत भिन्न असून त्यांचे आकारही भिन्न आहेत असे या पक्षाचे मत आहे. या पक्षाला द्वैतमत असें नांव आहे. द्वैतमत हे फार प्राचीन मत आहे. यानंतर आणखी एक पक्ष जन्मास आला. या पक्षाच्या मते जीवात्मा हा अनंत अस्तित्वाचाच एक भाग आहे. ज्याप्रमाणे देह हा लहानसें जग असून त्यामागें मन अथवा विचारशक्ति आणि या दोहोंच्यामागे जीवात्म्याचा वास आहे, त्याचप्रमाणे हे सारे विश्व देहासारखे असून त्यामागे विश्वव्यापी मन आणि त्याच्याही मागे विश्वव्यापी आत्मा आहे. या विश्वव्यापी देहाचा अंश हा लहान देह, मनाचा अंश हे लहानसें मन आणि विश्वव्यापी आत्म्याचा अंश हा लहानसा जीवात्मा आहे असें या दुसऱ्या पक्षाचे मत आहे. ज्याप्रमाणे हा देह विश्वदेहाचा अंश आहे, त्याचप्रमाणे मानवी मन विश्वव्यापी मनाचा अंश आहे आणि जीवात्मा हा विश्वव्यापी परमात्म्याचा अंश आहे. या मताला विशिष्टाद्वैत असें नांव आहे. विश्वव्यापी परमात्मा अनंत आणि सर्वव्यापी आहे हे आपणास ठाऊक आहेच. मग जें अनंत आहे त्याचे वेगवेगळे भाग पाडणे शक्य आहे काय ? त्याला कोणी आणि कसें तोडावें आणि त्याचे भाग तरी कशाने पाडावे? 'मी परमात्म्याचा अंश