पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२८२ स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.[नवमः


असून आतां मातृभूमीच्या सेवेसाठी ते येथे परत आले आहेत. कसलाहि गाजावाजा न करितां शांतपणे आणि मनःपूर्वक आपले कार्य करीत रहावें अशी त्यांची रीत आहे. त्यांच्याबद्दल माझ्या चित्तांत मोठा आदर आणि प्रेम वसत आहे. या उदारचरित स्त्रीपुरुषांच्या यादीत आणखीहि एक नांव आज मी गोंवणार आहे. मिस् मार्गारेट नोबल ऊर्फ भगिनी निवेदिता या जातीने इंग्रज असून त्यांनीहि आपला देह या देशाच्या चरणीं वाहिला आहे. त्यांच्या हातून पुष्कळ कार्य घडेल असा भरंवसा बाळगण्यास हरकत नाही.
 ( यानंतर भगिनी निवेदिता यांचे भाषण झाल्यावर उपसंहार करितांना स्वामीजी म्हणाले,)
 मला आतां दोनच शब्द बोलावयाचे आहेत. आपणा हिंदु लोकांनाहि काही तरी करितां येण्यासारखं आहे, इतकी कल्पना आतां आम्हांस आली आहे. तथापि इतकी कल्पनाहि न पटलेले लोक अद्यापि पुष्कळ आहेत. विशेषतः आपल्या बंगाली लोकांना कदाचित् याचे हसूहि येईल; पण मला मात्र तसे वाटत नाही. तुम्हां सर्वांच्या चित्तांत खळबळ करून सोडणे, हाच माझ्या जीविताचा आदिहेतु आहे. तुम्ही द्वैती आहात किंवा अद्वैती आहांत अथवा दुसऱ्या कोणत्या पंथाचे आहांत, या गोष्टीचा विचार मला कर्तव्य नाही. कोणत्याही पंथाचे तुम्ही असला तरी ती गोष्ट आपल्या कार्याच्या आड येणारी नाही. मुद्याची अशी एकच गोष्ट तुम्हांस सांगावयाची आहे. या गोष्टीचा उच्चार वारंवार करावा लागणे हेहि खरोखर दुर्दैव आहे; पण ती पुनःपुन्हां सांगितल्याशिवाय उपाय नाही, अशीच आपली आजची कृती आहे. आत्मविश्वास धरा असा उपदेश पूर्वी कित्येक वेळां मी केला आहे आणि आजहि पुनः मी तेंच करीत आहे. परमेश्वराची भक्ति तुमच्या चित्तांत उत्पन्न होण्याला आत्मश्रद्धा प्रथम पाहिजे. ती असेल तरच ईश्व राची ओळख तुम्हांस पटेल. तुमचा विश्वास आचार्यांच्या अद्वैत मतावर असो, मध्वाच्या द्वैतावर असो, अथवा पतंजलीच्या योगाभ्यासावर असो; आत्मविश्वास तुम्हांला नसेल तर हा विश्वास निरुपयोगी आहे. तुम्ही व्यासांचे उपासक असा अथवा विश्वामित्राचे उपासक असा; आत्मविश्वासाशिवाय तु मची कोणतीहि उपासना निरर्थक होईल. या आत्मश्रद्धेच्या तत्त्वासंबंधी पाश्चात्यांच्या व आमच्या धर्मविचारांत भेद आहे. प्रत्येक जीवात्म्यांत