पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२८० स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.[ नवम


आलो आणि येथेही त्याच वंशाची शक्ति अद्यापिही कार्यकारी स्थितीत आहे, असे मला आढळून आले. या सत्तेत पुष्कळ दोष आहेत ही गोष्ट खरी, तथापि तिच्यांतले सद्गुण अद्यापि अगदी लुप्त झाले नाहीत असें माझ्या प्रत्ययास आले. ब्रिटिश वंशाच्या अंगी पुढे पाऊल टाकण्याचा जो गुण आहे, त्याचें कार्य हिंदुस्थानांत सुरू असल्यामुळे अनिवार्यपणे आमचेंहि पाऊल उन्नतीच्या मार्गात पुढे पडत आहे. सांप्रतची पाश्चात्य संस्कृति मूळ ग्रीक संस्कृतीतून निघाली असून, तिचंच ती प्रत्यक्ष अपत्य आहे ही गोष्ट तुम्हांस ठाऊक असेलच. परोक्ष तत्त्वे प्रत्यक्षत्वास आणणे हा ग्रीक संस्कृतीचा विशेष होता; आणि अर्वाचीन पाश्चात्य संस्कृतींत अद्यापिहि तो शिल्लक राहिला आहे. हिंदु लोकांत विचारशीलता अधिक आहे, पण दुर्दैवाने पुष्कळ वेळां विचार करता करता आपण इतके शिथिल होतो की, आचाराचे बळ आपल्या ठ काणी उरत नाही. सारी कर्तृत्वशक्ति विचारांतच खर्च होऊन जाते, आणि आचाराच्या वेळी आपणांस शैथिल्य येते. यामुळे आमची विचारपरंपरा केवळ पुस्तकांत राहून तिची स्पष्ट क्रिया जगाच्या निदर्शनास आली नाही. याचा परिणाम असा झाला की, आपले विचार दडवून ठेवण्याची खोड आम्हांस लागली. आरंभी ही खोड फक्त व्यक्तीपुरतीच होती. हातून क्रिया घडत नाही तर बोलावें तरी कसे? या विचाराने विचार लपविण्याची इच्छा व्यक्तींना होऊ लागली. हळूहळू ही इच्छा स्वभावधर्मात शिरून ती दृढ झाली; आणि अखेरीस तिचा प्रसार सा-या राष्ट्रदेहांत होऊन, ती आमच्या चरित्रक्रमाचा एक भागच होऊन बसली. विचार आणि आचार यांत आमच्या ठिकाणी सांप्रत इतका विसंगतपणा आहे की, आमचा आचार पाहून आमची गणना जग मृतराष्ट्रांत करूं लागले. विचा रांचे कोणतेंहि स्पष्ट स्वरूप आमच्या आचारांत राहिलेले नाही. आमचे विचार सदोदित असेच अस्पष्ट स्थितीत रहात गेले तर आम्ही जगणार तरी कसे ? विचारांचे आचारांत रूपांतर आणि त्यामुळे उत्पन्न होणारी प्रगमन शीलता आणि कर्तृत्वशक्ति हा पाश्चात्य समाजाचा पाया आहे. पाश्चात्यांची सारी संस्कृती या दोन तत्त्वांच्याच आधाराने उभी राहिली आहे; आणि याच दोन तत्त्वांचा जो प्रसार हा अँग्लो सॅक्सन वंश आपल्या देशांत करीत आहे, त्यामुळे आम्हीहि झोपेतून जागे होत असून आपल्या विचारांना मूर्त-