पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

खंड ] कैवल्याचा मार्ग.२३

श्रवण आपणा सर्वांस कल्याणप्रद होवो. हे आपणास पुष्टिप्रद होवो. या कथेच्या श्रवणाने आपणास मनोबल प्राप्त व्हावे अशी आपण प्रार्थना करू या. इष्टमार्गावर आरूढ होण्यास ही कथा आपणास प्रवृत्त करो. असूयादि सारे विकार नष्ट करून सर्वांस ही कथा शांतिप्रद होवो.
 वेदान्त तत्त्वज्ञानातील विचारांची ही सामान्य दिशा आहे. याच धर्तीची विचारपरंपरा तुम्हांस साऱ्या वेदान्त ग्रंथांत आढळून येईल. आतां सांगितलेल्या कथेत एक अगदी नवी अशी विचारसरणी आपणास प्रथम आढळून येते. जगांतील कोणत्याही धर्मग्रंथांत या पद्धतीचे विचार तुम्हांस आढळावयाचे नाहीत. परमेश्वराचा वास कोठे तरी बाह्यविश्वांत असावा या समजुतीने जगांतील धर्मग्रंथ त्याचा शोध बाह्यजगांत करण्यास प्रवृत्त झाले आहेत. हाच प्रकार प्राचीन श्रुतिग्रंथांतही आढळतो. येथेही परमेश्वराचा शोध बाह्य विश्वांत सुरू असल्याचे दाखले आहेत. 'आरंभी काय होतें ?' हा प्रश्न अत्यंत प्राचीन ग्रंथांत आढळतो. 'ज्या वेळी अमुक होतें असेंही नाही आणि नव्हतें असेंही नाही आणि ज्या वेळी अंधार अंधारांत गुरफटलेला होता तेव्हां काय होते?' या प्रश्नाची चर्चा प्राचीन ग्रंथांत केली आहे. येथपासून तत्त्वज्ञानाच्या विचाराची प्रवृत्ति झाली. यानंतर देवादि प्राणी जन्मास आले; तथापि या प्रश्नाचा निकाल समाधानकारक रीतीने लागला नाही. त्या काळी ईश्वराचा शोध बाह्य विश्वांत चालला होता, यामुळे त्यांच्या शोधाला तेव्हां यश आले नाही. पुढे लवकरच हा काळ बदलला, आणि परमात्म्याचा शोध अंतःसृष्टीत सुरू झाला. परमेश्वराचा शोध तारकामय आकाशांत केला अथवा बाह्य विश्वांत आणखीही कोठे केला तरी आपल्या शोधाचा शेवट कधींच यावयाचा नाही आणि परमेश्वराचा थांग तेथे लागावयाचा नाहीं; हा श्रुतींचा मूळ सिद्धांत या बाह्य शोधाच्या काळानंतर जन्मास आला. जन्ममृत्यूचे रहस्य या बाह्य शोधाने कधीही समजावयाचे नाही असा श्रुतींचा निश्चय आहे. याकरितां अंतःसृष्टीचे पृथक्करण करणे त्यांना अगत्याचे वाटलें. हे पृथक्करण झाल्यानंतर विश्वाच्या साऱ्या रहस्याचा उलगडा झाला. हे रहस्य सांगण्याचे कार्य कोणत्याही ताऱ्याने अथवा सूर्याने केले नाही. बाह्य सृष्टीत भटकण्याचे सोडून मनुष्याने स्वतःच्या अंतःसृष्टीत बुडी मारली पाहिजे. या सृष्टीतील साऱ्या घटकांचा अभ्यास