पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२६० स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.[ नवम


झगडण्यास तयार असलेली अंतःकरणे एकत्र होणे हेच हिंदुस्थानाचें एक राष्ट्रीयत्व आहे.
 हिंदुस्थानात अनेक पंथ अगोदरच अस्तित्वात आहेत. आमच्या सा -यांच्या धार्मिक गरजा भागविण्यास पुरून उरण्याइतके ते आज आहेत आणि भविष्यत्कालींहि आणखी कित्येक निर्माण होतील. येथे अनेक पंथांस अवकाश मिळावा अशाच प्रकारची आमच्या मूलभूत तत्त्वांची रचना आहे. आमची परोक्ष तत्त्वे कसलाहि व्यावहारिक निबंध उत्पन्न करीत नाहीत. मूलभूत त त्वांचे अत्यंत विस्तृत विशदीकरण अनेक प्रसंगी आणि अनेक प्रकारे आजपर्यंत झाले असतांहि त्यांत आकुंचितपणाचा प्रवेश झाला नाही. कोणत्याही लहान मोठ्या वस्तूला आकाश ज्याप्रमाणे आपल्या पोटांत थारा देते, त्याप्रमाणे आमच्या धर्मतत्त्वांतहि हव्या त्या पंथाला स्थल मिळतें. आमच्या तत्त्वांचा विस्तार खुद्द प्रकृतीच्या विस्ताराप्रमाणे अनंत आणि सर्वव्यापी आहे. अशा स्थितींत अनेक पंथ तेथें सुखाने एकत्र नांदतात यांत नवल नाही. भांडण पंथांचे नसून पंथवाल्यांचे असते आणि ही युद्धे मात्र बंद करणे अवश्य आहे. पंथ हवे तितके असले तरी चिंता नाही, पण हठवादी पंथवाले मात्र नकोत. अशा हठवादी पंथवाल्यांच्या अस्तित्वाने जगाचा कांही फायदा होतो असें नाहीं; पण अनेक पंथ अस्तित्वात नसतील तर मात्र जगाचे गाडें ताव डतोब थांबेल. प्रत्येकाला सर्वच गोष्टी करितां येतात असे नाही. जगांतील समवायी कार्यशक्ति इतकी प्रचंड आहे की, तिचे नियमन मूठभर लोकांना करितां येणे कधीहि शक्य नाही. याकरितां श्रमविभाग अवश्य पाहिजेच. अत्यंत आवश्यकतेमुळेच श्रमविभागाचे तत्त्व जन्मास आले आहे आणि याच तत्त्वावर अनेक धर्मपंथहि अस्तित्वात आले आहेत. सूक्ष्म शक्तीचे यथायोग्य नियमन होण्याकरितां अनेक पंथ अस्तित्वात असणे अवश्य आहे. तथापि असे असतांहि या पंथांत तंटे भांडणे असावी हे अवश्य नाही. या दृश्य विविधतेमागें ऐक्य आहे ही गोष्ट आमची शास्त्रें फार प्राचीन काळा पासून उच्च घोषाने सांगत आली आहेत आणि हाच न्याय या अनेक पंथां सहि लागू आहे. अनेक मण्यांच्या पोटी ज्याप्रमाणे एकच सूत्र असते, त्या प्रमाणे या अनेक पंथांच्या पोटी एकच तत्त्व आहे. 'एकं सत् विप्रा बहुधा वदंति।' हा सिद्धांत आपण सर्वांनी नीट ध्यानात ठेवला पाहिजे. हे अनेक