पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२५८ स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.[ नवम


काही उरत नाही, अशा ज्ञानाच्या मागे ती लागली. बाह्य सृष्टि अनंत चम त्कांरांनी भरली आहे ही गोष्ट खोटी नाही. हीच सृष्टि महत्त्वाची आहे हेहि खरे, पण ती अस्थिर आहे, ती क्षणभंगुर आहे. आता जिवंत असलेली वस्तु क्षणार्धाने मृत्युमुखीं जाते; आतां सुखी म्हणून दिसत असलेला मनुष्य क्षणार्धानंतर दुःखांत चूर होऊन गेलेला आढळतो. अशा स्थितीत बाह्य सृष्टीचे महत्त्वही भासेनासें होते. तिच्या चमत्कारांतील चमत्कृति नाहींशी होते. ही गोष्ट आमच्या प्राचीन आर्यांच्या लक्षांत लवकरच आल्यामुळे अविकार्य आणि सदानंदरूप जें कांही आहे. त्याचे आकलन ज्या शास्त्राच्या अध्ययनाने होईल त्या शास्त्राच्या शोधाकडे त्यांची बुद्धि वळली. ज्या एकाच ठिकाणी चिर शांतीचा लाभ होतो, ज्या एकाच ठिकाणी चिरजीवन मिळतें, ज्या एकाच ठिकाणी पूर्णत्वाचा प्रत्यय येतो आणि ज्या एकाच ठिकाणी सर्व दुःखांची समाप्ति होते, त्या ठिकाणाचा शोध ज्या शास्त्राने लागेल तें शास्त्र सर्वांत श्रेष्ठतम होय हे उघड आहे; आणि याच शास्त्राच्या शोधाकडे आमच्या पूर्वजांची बुद्धि वळली. त्यांची इच्छा असती तर भौतिक शास्त्रेहि त्यांना करतलामलकवत् करता आली नसती असे नाही. जी शास्त्रे सिद्ध झाली असता पोटाला तुकडा मिळतो, शरिराला आच्छादन प्राप्त होते आणि फार तर आपल्या इतर बांधवांवर प्रभुत्व गाजविता येते, असली शास्त्रे त्यांनी सहज शोधून काढली असती. ज्या शास्त्रांच्या शोधाने आपल्या इतर बांधवांस जिंकून त्यांना आपले गुलाम करितां येते आणि ज्या शास्त्रांच्या शोधाने 'बळी तोच कानपिळी' होतो, ती शास्त्रे त्यांच्या विशाल बुद्धीला अगम्य नव्हती. पण परमेश्वराची मोठी कृपा ती हीच की, ही ऐहिक सृष्टि सोडून त्यांची बुद्धि लवकरच उलट बाजूला वळली. बाह्य सृष्टीहून अधिक श्रेष्ठ अशा अंतःसृष्टीचा अभ्यास आमच्या पूर्वजांनी केला. या सृष्टीत त्यांचे चित्त इतकें रममाण होऊन गेले की, बाह्य जगाकडचे त्यांचे लक्ष अगदीच सुटले; आणि आनुवंशिक संस्कारांनी ही निवृत्ति त्यांच्या वंशजांतहि उतरूं लागली. अखेरीस निवृत्ति-मार्गप्रियता ही साऱ्या राष्ट्राची निशाणी होऊन बसली. बुद्धीचे हे वळण थेट आमच्यापर्यंतही आज येऊन पोचलें आहे. हजारों वर्षे हेच संस्कार पिढयानपिढया हिंदुवंशांत उतरत आलेले आहेत. आणि आज तेच आमच्या जीविताशी एकरूप होऊन बसले आहेत. आमच्या नाड्यांतील रक्तच्या प्रत्येक थेंबांत त्यांचा संचार आहे. ते आमच्याशी