पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

खंड ] कैवल्याचा मार्ग. २१

झाली पाहिजे आणि नंतर दृष्टि अंतर्मुख करण्याची खटपट केली पाहिजे. या दोन परीक्षांतून उत्तीर्ण झाल्यावांचून आपणास आत्मदर्शन होणे शक्य नाही. बाह्य विश्व सुंदर आहे ही गोष्ट कोण नाकबूल करील ? पण त्याच्या सौंदर्याकडे पाहून त्यांतच भटकत राहणे हा ईश्वरदर्शनाचा मार्ग मात्र नव्हे. या बाह्यविश्वाकडे आपल्या दृष्टीची पाठ कशी वळवावी आणि तिला अंतर्वर्ती कसे करावे याचे ज्ञान आपण करून घेतले पाहिजे. बाह्यसौंदर्यावर लुब्ध होऊन तेंच पाहत बसणे ही गोष्ट आपल्या डोळ्यांस फार प्रिय आहे; पण त्यांची ही संवय आपण मोडून टाकली पाहिजे. या संवयीला आपण आळा घातला पाहिजे. एखाद्या मोठ्या रहदारीच्या रस्त्याने आपण चालत असलों म्हणजे गाड्याघोड्यांच्या गोंगाटामुळे आपल्याबरोबर चालणाऱ्या आपल्या एखाद्या मित्राचे बोलणेही आपणास ऐकू येत नाही. आजूबाजूचा गोंगाट इतका मोठा असतो की त्याचे बोलणे त्यांत बुडून जाते. बाहेरचा गोंगाट मोठा असल्यामुळे तुमचे मनही त्या गोंगाटाकडेच अगोदर वळतें, आणि यामुळे मित्राच्या भाषणाकडे तें असत नाही, आणि त्याचे भाषणही तुम्हांस ऐकू येत नाही. त्याचप्रमाणे आपल्या भोवतालचे हे बाह्यजग इतका मोठा गोंगाट करीत असते की आपलें चित्त त्याकडे अवश्य ओढले जाते. अशा स्थितीत अत्यंत निगूढ भागांत वास करणारा आत्मा आपणास कसा दिसेल ? याकरितां मनाचे हे बहिर्वर्तित्व प्रथम बंद करणे अवश्य आहे. दृष्टि अंतमुंख करणे याचा अर्थ हाच. दृष्टि अंतर्मुख झाली म्हणजेच आंतील परमात्मरूपाचें सारें वैभव आपल्या नजरेसमोर उभे राहील.
 या आत्म्याचे स्वरूप तरी काय आहे ? हा आहे तरी कसा ? तो बुद्धीच्याही पलीकडचा आहे हे आपण पाहिलेच, त्याचप्रमाणे तो अनंत आणि सर्वव्यापी आहे हेही या श्रुतीवरून आपणास कळून आलेच आहे. तुम्ही, मी आणि बाकीचे सर्व प्राणी सर्वव्यापी आहों. त्याचप्रमाणे आत्मा नित्य, एकरूप आहे हेही आपणास समजले. तो जर सर्वव्यापी आहे तर तो एकच असला पाहिजे हे उघड आहे. दोन पदार्थ सर्वव्यापी असू शकणारच नाहीत, हे उघड आहे. ही गोष्ट सर्वथा अशक्य आहे. त्याचप्रमाणे दोन पदार्थ अनंतही असू शकणार नाही. याकरितां अनंत आणि सर्वव्यापी ‘परमात्मा एकच असला पाहिजे, आणि तुम्ही, मी व हे सारे विश्व एकरूपच