पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हिंदु धर्मातील सामान्य सिद्धान्त.

(लाहोर येथील व्याख्यान)
 पवित्र आर्यावर्तातील ही पवित्रतम भूमि आहे. ब्रह्मावर्त या नांवानें भ गवान् मनूंनी जिचा उल्लेख केला आहे ती भूमी हीच. हे सारे दृश्य उलंघन करून त्यापलीकडे असलेल्या भूमीचा शोध करण्याची उच्चतम महत्त्वाकांक्षा प्रथम याच भूमीला झाली; आणि याच भूमीतून निघालेल्या ज्ञानगंगेच्या प्रचंड ओघाने सर्व जग पावन झाले. सर्व जगाला शांति देण्याचा मार्ग याच भूमींपासून झाला. या भूमीतील नद्या जशा मोठ्या, त्याचप्रमाणे तींत उत्पन्न होणारे ज्ञानप्रवाहही प्रचंड. या साऱ्या प्रवाहांचा संगम झाल्यानंतर जो झोत उत्पन्न झाला, त्याने हिंदुस्थानाचेच नव्हे तर साऱ्या जगाचे आक्रमण केले. त्याच्या भव्य नादाने दशदिशा दुमदुमून गेल्या. आर्यावर्तावर झालेल्या साऱ्या स्वाऱ्यांचा पहिला मोठा तडाखा याच भूमीने सहन केला आहे. आ वर्तावर स्वाऱ्या करणाऱ्या रानटी लोकांना शौर्याने प्रथम तोंड देणारी भूमी हीच. इतकी युद्ध आणि दुसरेहि नाना प्रकारचे ताप सहन करून ही भूमी अद्यापिहि क्षत्रियत्वाची खाण राहिली आहे. तिचे वैभव आणि सामर्थ्य ही अद्यापिहि शिल्लक आहेत. याच भूमीत श्रीनंकचा जन्म झाला आणि जगाला त्यांनी प्रेमाचा मार्ग दाखविला. त्यांनी हिंदूंनाच नव्हे तर मुसलमा नांनाहि आपले बाहु पसरून आलिंगन दिले. आपल्या प्रेममय अंतःकरणांत हिंदु आणि मुसलमान या दोघांसहि एकाच भावनेने त्यांनी ठाव दिला. याच क्षेत्रांत नानकाच्या मालिकेतील धैर्यशाली आणि उज्ज्वलकीर्ति गुरु गोविं दसिंग जन्मास आला. धर्मकार्यासाठी आपल्या स्वतःचा आणि आपल्या आप्तेष्टांचा बलि त्याने दिला. ज्यांच्या हितासाठी त्याने हे स्वात्मार्पण केले, ते त्यास सोडून गेले असतांहि त्या गोष्टीची दिक्कत न बाळगतां आपलें कार्य पुरे करून त्याने देशत्याग केला. घायाळ झालेल्या सिंहाप्रमाणे गुहेच्या एकांतांत त्याने देह विसर्जन केला. ज्यांनी ऐन प्रसंगी त्याजकडे पाठ फिर विली, त्यांजबद्दल मृत्युसमयींहि त्याने कुरकुर केली नाही. कोणाविरुद्ध

एक शब्दहि मुखावाटे बाहेर पडूं न देतां शांत चित्ताने त्याने देहविसर्जन केलें.