पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खंड.] आपणांपुढील कार्य. २४९


टीकाकारांच्या अनेक प्रकारच्या मतांत कितीहि विरोध आढळत असले तरी एका सिद्धांताबद्दल सर्वांचे एकमत आहे. आत्मा हा स्वभावतःच पूर्ण पवित्र आणि सच्चिदानंद स्वरूप आहे यावद्दल कोणाचाच वाद नाही. यांत फरक इतकाच की, त्याचे आकुंचन आणि विकसन परिस्थित्यनुरूप होतें असें श्रीरामानुज म्हणतात आणि मायावरणामुळे तसे झाल्याचा भास उत्पन्न होतो असें श्रीशंकराचार्य म्हणतात. या बारीकसारीक मतांतराकडे आपण काना डोळा करावा. व्यक्त अथवा अव्यक्त स्थितीत आत्म्याचे मूलरूप एक आहे याबद्दल कोणाचा वाद नाही. या एका आद्य सिद्धांताला तुह्मी निश्चयाने चिकटून रहा. विश्वांतील सारी शक्ति तुमच्या ठिकाणी एकवटली आहे, तुह्मांला करण्यास अशक्य असे काही नाही. दौर्बल्य येऊ न देतां असा आत्मविश्वास धरा. मी दुबळा आहे, मी अर्धवेडा आहे अथवा मला अमुक गोष्ट समजत नाही असे म्हणण्याची खोड आज आपणांस आहे. ही दुष्ट खोड प्रथम टाकून द्या. कोणाच्याहि मदतीवांचून वाटेल ती गोष्ट मी करीन असें ह्मणत चला. विश्वांतील सर्व शक्ति तुमच्या ठिकाणी गुप्तरूपाने आहे ती

व्यक्तदशेला आणणे इतकेंच तुमचे कार्य आहे.


**********