पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

२० स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.[ नवम

आहे. तें बुद्धीच्याही पलीकडचे आहे. तें अविनाशी आहे. त्याचे दर्शन आपणास झाले म्हणजे आपलें मरण मरून जाते. मृत्यूच्या टप्प्याबाहेर आपण जातो."
 आपणा सर्वांचे अखेरचे साध्य काय आहे याचे वर्णन यमाने अशा प्रकारें केले आहे. सत्यवस्तूचा लाभ आपण करून घेतला तर जन्म, मरण आणि जगांतील अनंत दुःखें या सर्वांच्या बाहेर आपण जातो. संसारप्रवाहाबरोबर वाहात असतां आपली आपटधोपट किती वेळां तरी होत असते. एकदां सुखाच्या उच्च शिखरावर आपण आरूढ होतो आणि दुसऱ्याच क्षणी दुःखाच्या भोवऱ्याच्या तळाशी आपण जातो. या हालांपासून आपली सुटका आपणास करून घेणे असेल तर सत्यवस्तूचा लाभ करून घेण्यावांचून दुसरा मार्ग आपणास नाही. या सत्यवस्तूचे स्वरूप काय ? नित्यता हेच तिचे स्वरूप. ती अशाश्वत नाही. मनुष्याचा जो अंतरात्मा तीच सत्यवस्तु. या दृश्य विश्वाच्या मागे असलेलें जें अदृश्य अधिष्ठान तीच सत्यवस्तु. या वस्तूला जाणणे अत्यंत कठीण आहे असें यमराज सांगतात. जाणणे याचा अर्थ बुद्धीने अथवा तर्काने समजणे असा नव्हे, हे अवश्य लक्ष्यात ठेवलें पाहिजे. जाणणे म्हणजे आत्मानुभव होणे. मुक्ति म्हणजे आत्म्याचा प्रत्यक्ष अनुभव होणे. या आपल्या चर्मचक्षुंनी त्याला पाहणे आपणास शक्य नाही. तो दिसण्यास आपली अंतर्दृष्टि अत्यंत सूक्ष्म व्हावयास पाहिजे. ही समोरची भिंत आपण पाहतों अथवा ही पुस्तकें आपणास दिसतात. या ठिकाणी जड दृष्टीने जड वस्तू आपण पाहत असतो; पण अत्यंत सूक्ष्म वस्तु पाहण्यास आपली दृष्टिही अत्यंत सूक्ष्म केली पाहिजे हे उघड आहे. या साऱ्या ज्ञानाचें रहस्य हेच होय. त्याचप्रमाणे असें दर्शन करू इच्छिणाराने अत्यंत पवित्र झाले पाहिजे असेंही यमराजांचे म्हणणे आहे. आपली दृष्टि अत्यंत सूक्ष्म करण्याचे साधन पावित्र्य हेच होय. पावित्र्य प्रथम सांगून नंतर इतर मार्गाकडे यमराज वळले आहेत, हे अवश्य लक्ष्यात ठेवण्यासारखे आहे. तें स्वयमेव एक इंद्रियांपासून अत्यंत दूर अंतरावर आहे. इंद्रियें बाह्यद्रष्टी आहेत. बाह्य जग पाहणे इतकेंच काम ती करू शकतात. आत्मा हा बाहेर कोठे सांपडणारा पदार्थ नसल्यामुळे इंद्रियांस तो कसा सांपडेल ? त्याचे दर्शन होण्यास आपली दृष्टि आंत वळविली पाहिजे. आत्मलाभाची इच्छा प्रथम