पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२४४ स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.[ नवमः


या मूळ संहितेवर निरनिराळ्या टीकाकारांनी आपापल्यापरी अनेक प्रकारच्या टीका केल्या आहेत, हे तुम्हांस ठाऊक आहेच. अवतारी पुरुषांनी याच तत्त्वांचे प्रत्यक्ष विशदीकरण केले. या अनेक प्रकारच्या स्पष्टीकरणांस अनुसरून अनेक पंथहि अस्तित्वात आले. या श्रतिग्रंथांतील कित्येक सिद्धां तांत आपणांस विरोधहि आढळून येतो. यांतील कांहीं ग्रंथ शुद्ध द्वैतपर असून दुसरे कांहीं शुद्ध अद्वैतपर आहेत. एखादा टीकाकार द्वैतवादी असला म्हणजे अद्वैतपर मते खोडून काढणे हे आपले कर्तव्य आहे असे त्याला वाटते. त्याच्या बुद्धीचा पल्ला द्वैतापलीकडे गेलेला नसतो; यामुळे अद्वैतपर वचनेंहि द्वैतपर लावण्याचा यत्न तो करितो; आणि अशाच रीतीने अद्वैत वादीहि त्याला प्रत्युत्तर देत असतात. अशा रीतीने दोन तट पडून त्यांत युद्ध सुरू होतात. पण हा कांहीं वेदग्रंथांचा अपराध नव्हे. सारे श्रुतिग्रंथा शुद्ध द्वैतपर आहेत असे सिद्ध करूं पाहणे जितकें मूर्खपणाचे आहे, तितकेंच ते अद्वैतपर मानणे चुकीचे आहे. ते द्वैतपर आहेत आणि अद्वैतपरही आ हेत. अर्वाचीन काळी नव्या कल्पनांचा उदय होऊन त्यांच्या दृष्टीने श्रुति ग्रंथांच्या रहस्याचा उलगडा करणे सुकर झाले आहे. मानवी मनाची स्थिति पाहतां या दोन्ही मतांचे अस्तित्व अवश्य आहे असे आपणांस आढळून येईल. या दोहोंच्या अस्तित्वावांचून त्याची उत्क्रांति सुलभपणे घडून येणार नाही; आणि याकरितांच वेदग्रंथांनी या दोहोंचेंहि विवरण केले आहे, अखेरची मजल सुखरूपतेनें गांठता यावी म्हणून श्रुतिमातेने या मार्गाला क्रमशः चढत्या अशा पायांची योजना केली आहे, हे तिचे मोठे उपकार होत. परस्परविरोधी वचने योजून तट उपस्थित करावे आणि अशा रीतीने भावी युद्धाचे बीजारोपण करावे असा श्रुतींचा हेतु नाही. आपल्या मुलांना अशा रीतीने भुलवून भलत्याच मार्गाला नेण्याचे कार्य श्रुतींनी केलेले नाही. आपल्या लहानग्या लेकरांकरितांच नव्हे तर काही तरुणांकरितांहि या पाय -यांची योजना श्रुतींनी केली आहे. लहान मुलांना तर त्यांची आवश्यकता आहेच, पण पुष्कळशा मोठ्या माणसांनाहि त्यांची गरज आहे. आम्हाला देह आहे आणि देह हाच मी अशी आमची भावना आहे तोपर्यंत व्यक्तिविशिष्ट परमेश्वराचीहि जरूर आम्हांला आहे. आम्हाला पांच इंद्रिये आहेत आणि त्यांच्या द्वारे आम्हांहून वेगळ्या अशा बाह्यजगाचा अनुभव आह्मांस होतो