पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खंड.] आपणांपुढील कार्य. २३९


नांना चिकटून बसून आपलें सारें अस्तित्व जो विषदिग्ध करितो, असला मेंदू तुमच्या डोक्यांत उत्पन्न होऊ न देण्याविषयी तुम्ही खबरदारी घ्या. हिंदुस्था नाच्या उन्नतिमार्गात दोन मोठी भयावह स्थलें आज आपल्या नजरेसमोर आहेत. जडवाद अत्यंत मोहकरूपाने आपणांसमोर उभा ठाकला आहे; आणि त्याबरोबरच जुन्यापुराण्या खुळ्या कल्पनाहि आपणांस चिकटून बसल्या आहेत. एका बाजूला आड आणि दुसऱ्या बाजूला विहीर अशी आजची आपली स्थिति आहे. या दोन्ही भयांना चुकवून आपला पुढील रस्ता आपण सुधारला पाहिजे. पाश्चात्य विद्येच्या आकंठपानाने आपले डोके धुंद करून घेऊन स्वतःस सर्वज्ञ समजणारा असा प्राणी आज निर्माण होऊ लागला आहे. आपल्या प्राचीन ऋषिवर्यांचे ज्ञान त्याला तुच्छ वाटते. त्यांची थट्टा उडवून स्वतःची क्षणभर करमणूक करून घेण्यासहि तो मागेपुढे पहात नाही. आपले सारे जुनें तत्त्वज्ञान म्हणजे निवळ अर्थशून्य भारुड, धर्मज्ञान ही शुद्ध बालिश बडबड आणि हिंदुधर्म म्हणजे गाढवांचा गोंधळ असें त्याला वाटते. याच्या अगदी उलट असा दुसराहि एक नमुना आढळून येतो. हा दुसरा गृहस्थ सुशिक्षित पण एकविषयभ्रांत असतो. पहिला जसा एका टोकाला तसाच हा दुसरा दुसऱ्या टोकाला जाऊन बसलेला असतो. पालीची कारिका, शिंकेचें फळ, आणि काक शब्दाचें फळ काय आहे, हेच तो शोधीत असतो. आपल्या प्रत्येक वेडामागे धर्मज्ञान उभे आहे; आणि तत्त्वमीमांसेचे पाठबळ त्याला आहे, असे त्याला वाटत असते. आपल्या खेड्यांतला म्हसोबा हाच त्याचा देवाधिदेव. आपल्या खेड्यांतील प्रत्येक चालरीत हीच त्याची वेदाज्ञा; आणि यांतील एखाद्यांत थोडीशीहि चूक होऊ न देण्याविषयीं तो दक्ष असतो. आपली ही व्रतें तंतोतंत पाळणे हाच राष्ट्रोद्धाराचा मार्ग आहे असे त्याला वाटते. ह्या दोन्ही नमुन्यांवर फार सावधगिरीची नजर आपण ठेविली पाहिजे. शुद्ध निरीश्वरवादी बनून चार्वाकाचे कट्टे शिष्य तुम्ही झाला तरीहि एकवार मला पुरवेल, पण बालिश कल्पनांना धर्म म्हणून तुम्ही चिकटून बसला तर ते मला नको. निरीश्वरवादी कितीहि वाईट झाला तरी तो जिवंत प्राणी असतो. स्वतःच्या कर्तबगारीवर त्याचा काही तरी विश्वास असतो. अशा माणसाचा थोडाबहुत तरी उपयोग तुम्हांस करून घेतां येण्यासारखा आहे. पण धर्म म्हणून शुद्ध मूर्खत्वाला ज्याने मिठी मारली, त्याचा मेंदू कामां-