पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

खंड] कैवल्याचा मार्ग. १९

प्रमाणे शब्दपांडित्यानेही तो मिळत नाही. जो नेहमी अकर्म करण्यांत गढलेला असतो, ज्याचें मन स्थिर नाही, ज्याला एकांतिक ध्यान साध्य होत नाही आणि ज्याचें मन सदोदित व्यग्र व अनेक व्यवसायांत निमग्न त्याला आत्मानुभवाची प्राप्ति कधीही व्हावयाची नाही. आत्म्याची वस्ती अंतःकरणाच्या अत्यंत निगूढ भागांत आहे. ज्याला आपल्या मताने तेथपर्यंत बुडी मारतां येत नाही त्याला त्याच्या दर्शनाचा लाभ कसा होईल ?
 नाचिकेता, हे शरीर रथासारखे असून इंद्रियगोलक हे त्या रथाला जोडलेल्या घोड्यांप्रमाणे आहेत. बुद्धि हा रथकार होय; आणि आत्मा या रथांत बसला आहे. बुद्धीच्या द्वारें मनाशी व मनाच्या द्वारे इंद्रियांशी आत्मा संयुक्त होतो, तेव्हां तो भोक्ता असें म्हणवितो. त्या वेळी तो पाहतो, ऐकतो आणि दुसऱ्याही साऱ्या क्रिया करतो. ज्याचा ताबा आपल्या मनावर नाही आणि ज्याला आत्मानात्मविवेक नाही, त्याची इंद्रियेही भडकलेली असतात. बेफाम झालेले घोडे ज्याप्रमाणे रथकाराच्या ताब्यांत न राहतां वाटेल तिकडे उधळतात, त्याचप्रमाणे स्वैर सुटलेली इंद्रियेही बुद्धीच्या ताब्यांत न राहतां वाटेल तिकडे भटकतात; पण ज्याला आत्मानात्मविवेक आहे आणि मनोनिग्रह ज्याला करता येतो, त्याची इंद्रियें अनावर न होता त्याच्या ताब्यांत राहतात. ज्याचे चित्त सदोदित पवित्र आणि आत्मानुसंधानांत निमग्न असतें त्यालाच सत्यवस्तूची प्राप्ति होते. सत्यवस्तूची प्राप्ति ज्याला झाली तो जन्ममरणाच्या फेऱ्यांत पुन्हां सांपडत नाही.
 नाचिकेता, अशी जन्ममरणातीत स्थिति प्राप्त करून घेणे हे फार कठीण काम आहे. हा मार्ग फार दीर्घ आणि अत्यंत परिश्रमाचा आहे. ज्याची दृष्टि अत्यंत सूक्ष्म झाली असेल त्यालाच आत्मदर्शनाचा लाभ होणे शक्य आहे. हा मार्ग अत्यंत खडतर आहे हे खरे; तथापि असे असले म्हणून भिण्याचे कारण नाही. ' उत्तिष्ठत जाग्रत प्राप्यवरान्निबोधत ' हा उपदेश पक्का ध्यानात धरून चिकाटीने मार्गाला लाग, आणि अखेर गांठीपर्यंत मध्ये कोठेही थांबूं नको. ' क्षुरस्य धारा निशिता दुरत्यया दुर्ग पथः तत्कवयो वदंति ' असे याचे वर्णन महात्म्यांनी केले आहे. जो इंद्रियातीत झाला असेल, जो स्पर्शातीत असेल, जो नामरूपातीत असेल तोच त्या सदा एकरूपाच्या दर्शनाला योग्य होतो. तें रूप अनंत आहे; तें नित्य