पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खंड.] आपणांपुढील कार्य. २२९


अशा रीतीने प्राचीन हिंदु संस्कृतीला पुनः चालन मिळत आहे. या धक्क्याने आपली निद्रावस्था ती टाकीत आहे. ग्रीक संस्कृतीचे आगमन म्हणजे नव्या जिवटपणाचा प्रारंभ होय. आज हिंदुस्थानांत नव्या विचारांचा प्रसार दिसत आहे, नवी जागृती उत्पन्न झाली आहे, आणि अमूर्त कल्पनांना मूर्तरूप देण्याची धडपड सुरू झाली आहे, याचे कारण पाश्चात्य संस्कृतीचे येथे झालेलें आगमन हेच होय. मानवी जीविताबद्दलच्या आकुंचित कल्पना हळू हळू विराम पावत असून त्यांच्या जागी अधिक विस्तृत आणि अधिक उदार कल्पनांचा उदय होत आहे. ज्यांचा जन्म पूर्वी येथेच झाला, त्याच आतां येथे वाढीला लागल्या आहेत असे आपणांस आढळून येईल. आमच्या पूर्व जांनी त्यांना जन्म दिला पण दीर्घ काळपर्यंत त्या अमूर्तावस्थेत होत्या; आणि त्याच आतां मूर्तरूपास येऊ पहात आहेत. अधिक विस्तार पावणे, वाढीस लागणे, इतरांशी मिसळत जाणे, आणि अखेरीस विश्वरूप होणे, हे आपले अखेरचें साध्य आहे. पण हा आद्य हेतु दृष्टिआड करून दिवसेंदिवस आमचा परिघ आम्ही अधिक आकुंचित करू लागलो. जगांत मिसळण्याऐवजी त्यापासून आम्ही विभक्त होऊ लागलों आणि या विभक्तपणाबरोबरच श्रुति मातेने आम्हांस दिलेल्या ठेव्याच्या वारसदारीलाही आम्ही सोडचिट्ठी दिली.
 या विस्तार पावण्याच्या मार्गात अनेक धोक्याची स्थळे आहेत; आणि यांपैकी प्रमुख म्हटलें म्हणजे आपणा स्वतःबद्दल फाजील घमेंड असणे हे होय. आम्ही परमेश्वराचे लाडके लोक आहो असें वाटणे ही या मार्गातील मोठी धोंड आहे. भारतभूमीवर माझें प्रेम अतिशय आहे, देशाभिमानांत मी कोणाला हार जाणार नाही, आणि पूर्वजांबद्दलची पूज्यबुद्धिहि अत्यंत जागृत आहे; पण असे असतांहि बाह्यदेशीयांकडून आपणांस शिकण्यासारखे असें पुष्कळ आहे असें म्हटल्यावांचून मला राहवत नाही. आपल्या ठिकाणी शिष्यभाव सदो दित जागा असावा. शिष्य म्हणून कोणाच्याहि पायांपाशी बसण्याची आपल्या चित्ताची तयारी असावी. कारण, ज्याच्यापासून आपणांस कोणताही मोठा बोध घेता येणार नाही, इतका मूढ प्राणी जगांत कोणीही नाही हे आपण लक्ष्यात ठेवले पाहिजे. अत्यंत क्षुद मनुष्यापासून आणि अंत्यजापासूनही सद्बोध घ्यावा, आणि सेवेच्या मार्गाने स्वर्गाचा पल्ला गांठावा असें मनूनेही म्हटले आहे. मनूचे खरे वंशज अशी संज्ञा स्वतःस न्यायाने लावून घेण्याची