पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२२८ स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ. [नवम


तात, त्यांच्या अवनतीबद्दल अधिक काही सांगण्याचे कारणही नाही. कोणी कोणाला स्पर्श करावा आणि कोणाचा स्पर्श झाला असता कसले प्रायश्चित्त असावें, असल्या श्रुष्क चर्चेला जेथें तत्त्वज्ञानाचे प्राधान्य मिळाले होते, तेथें अवनती कळसास पोंचावी यांत नवल नाही. असल्या शुष्क विचारांचे रान पुढे इतकें माजलें की, ज्यांचा प्रकाश साऱ्या जगाला पुरून उरावा असली वेदान्त तत्त्वरत्नेही अर्धी मुर्धी मलिन होऊन गेली. या माजलेल्या रानांत त्यांचे थोडें बहुत रक्षण काहीं संन्याशांनी केले, यामुळे आज ती आपल्या नजरेस तरी पडत आहेत. हे अरण्यवासी संन्यासी आपल्या पूर्व जांचे अमूल्य धन अशा रीतीने मोठ्या शर्थीने रक्षीत असतात. बाकीचा सारा देश स्पर्शास्पर्शविचार, सोंवळे ओवळे आणि अन्न यांच्या गोष्टी करीत बसला होता. या नंतर मुसलमानांच्या स्वा-यांस लवकरच सुरवात झाली. मुसलमानांपासूनही आम्हांस कित्येक चांगल्या वस्तूची प्राप्ति झाली आहे. सा-या चांगल्या वस्तूंचा संग्रह कोणा एकाच्याच हाती असावा असा ताम्रपट परमेश्वरानें कोणालाही दिलेला नाही. एखाद्या अतिश्रेष्ठ मनुष्याला अत्यंत कनि ष्ठापासूनही काहीच बोध घेतां येण्यासारखा नसतो असें नाहीं. मुसलमानांपासून काही चांगल्या वस्तू आम्हांस मिळाल्या खऱ्या, पण त्यांजपासून हिंदु वंशाला नव्या जोमाची प्राप्ति झाली नाही. यानंतर या देशाचा राजदंड ईश्वरसत्तेने इंग्र जांच्या हाती गेला. एक देश दुसऱ्याच्या ताब्यांत जाणे ही गोष्ट केव्हाही झालें तरी वाईटच. परकीय सरकार ही देशावरील मोठी आपत्ति आहे, यांत संशय नाही; पण वाइटांतूनहि चांगल्याची निपज होते हैं विसरतां कामा नये. या नियमाला अनुसरून या परकीय सत्तेपासूनही हिंदुस्थानाला एक मोठा फायदा झाला आहे. इंग्लंडच्याच नव्हे तर साऱ्या युरोपाच्या अर्वाचीन संस्कृतीचे जनकत्व ग्रीक संस्कृतीकडे आहे. युरोपांतील प्रत्येक वस्तूच्या पोटी ग्रीक संस्कृतीचे बीज आहे. युरोपांतील प्रत्येक इमारत आणि घरांतील सामानसुमानाचा प्रत्येक तुकडा आपले मूलस्थान जगजाहीर करीत असतो. ग्रीक संस्कृतीचा छाप जीवर पडलेला नाही, अशी एकहि वस्तु साऱ्या युरोपांत तुम्हांस आढळावयाची नाही. युरोपांतील अर्वाचीन शास्त्रे आणि कला ही ग्रीक जननीचींच लेंकरें आहेत. अशा स्थितीत इंग्लंड

आणि हिंदुस्थान यांचा संगम म्हणजे ग्रीक आणि हिंदुसंस्कृतीचा संगम होय.