पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२२६ स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.[नवम


प्रचंड अरण्ये पसरली होती. यांचा विस्तार इतका मोठा होता की, यांच्या पलीकडे जग म्हणून काही असूच नये असे एखाद्यास वाटावें. संस्कृतीच्या संपर्काचा नुसता वाराही लागण्याचा संभव येथे नव्हता. येथे राहणा रास जगाच्या कोणत्याही उपाधीपासून बाधा होण्याजोगी नव्हती. यामुळे येथील रहिवाशांचा लौकिक संबंध आपोआप तुटून त्यांची वृत्ति स्वाभा विकपणेच अन्तर्मुख झाली. त्यांची दृष्टि बाह्य जग सोडून अंतःसृष्टीकडे पाहूं लागली. आर्यांना बुद्धीच्या विशालत्वाची जोड स्वाभाविकपणेच मिळाली होती. त्यांची उपजतबुद्धीच अंतस्थ विचारांकडे वळणारी होती. तशांतून त्यांचा वास ज्या स्थळी झाला तें नितांत रमणीय. प्रचंड नद्या, उत्तुंग गिरिशिखरें आणि अफाट वनराजी यांच्या साहचर्यात त्यांची उपजतबुद्धि जागृत होऊन ती अंतःसृष्टीचा विचार करू लागली यांत नवल नाही. मानसिक शक्तीचे पृथक्करण हा एकच विषय हिंदु आर्यांनी विचाराकरितां आपल्या हाती घेतला होता. ग्रीक लोकांची स्थिति याहून वेगळ्या प्रकारची झाली. जगाच्या ज्या भागांत त्यांनी वास केला, तो भाग सुंदर आणि रमणीय खरा पण त्यांत उदात्तपणा नव्हता. आजूबाजूची सृष्टि अत्यंत मोहक पण तिच्यांत कोणाचें चित्त अंतर्मुख करण्यापेक्षा बहिर्मुख करण्याचा गुण अधिक होता. सृष्टीने आपल्या साऱ्या सौंदर्याचा वर्षाव येथे सढळ हाताने केला होता. पण तेथील रहिवाशांची चित्तवृत्ति आपल्याच ठिकाणी गुंतवून ठेवावी असा गुण या सौंदर्यात होता. यामुळे तेथील ग्रीक कुलाचें मन या बाह्य सृष्टीकडे धाव घेऊ लागले; ही गोष्ट स्वाभाविकपणेच घडली. या बाह्यसृष्टीचे पृथक्करण कर ण्याकडे त्या मनाचा कल झाला. यामुळे हिंदुकुलाच्या द्वारे सारें पृथक्करण शास्त्र अवतीर्ण होऊन सृष्ट पदार्थांची शास्त्रे ग्रीक कुलांतून उद्भवली. हिंदु मन आपल्या दिशेने गेले आणि त्याने विश्वव्यापी सिद्धांत निर्माण केले. आजच्या काळीहि हिंदवासीयांची तर्कबुद्धि आणि त्यांच्या मेंदूचे विशालत्व ही सान्या जगांत अव्वल प्रतीची आहेत. आमच्या येथील तरुण कोठेही बाह्यदेशी गेले, तरी बुद्धीच्या बाबतीत दुसऱ्या कोणत्याही देशांतील तरुणांवर अद्यापि मात करितात, हा आपला नित्याचा अनुभव आहे. पण याच वेळी आणखीहि एक मुद्दा लक्ष्यात ठेविला पाहिजे. मुसलमानांनी हिंदुस्थान देश जिंकण्यापूर्वी एकदोन शतकें आमच्या अवनतिकालास सुरवात झाली. त्या वेळी या बुद्धि- --