पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
आपणांपुढील कार्य.
-------*------

 जगाच्या व्यवहाराचा गाडा आपला मार्ग जो जो अधिक आक्रमीत जात आहे, तो तो मानवी जीवितापुढील प्रश्न अधिक खोल आणि अधिक विस्तृत होत आहे. मानवी जीविताचा अंतिम हेतु काय, या प्रश्नाची चर्चा फार प्राचीन काळी होऊन त्याचा निकालही तेव्हां लागला. 'सर्वं खल्विदं ब्रह्म' हे तत्त्व श्रुतीने प्रथम शोधून काढले त्याच वेळी या प्रश्नाचाही निकाल लागला. सृष्टीतील यच्चयावत् पदार्थ एकमेकांशी इतके पूर्ण बद्ध झालेले आहेत की, आपणाबरोबर दुसऱ्याला ओढल्यावांचून तींतील एक परमाणूहि कांहीं हालचाल करूं शकत नाही. सारे जग उन्नतीच्या मार्गाला लागल्या शिवाय एकाचाही प्रवास सुखरूपपणे होऊ शकत नाही. आतापर्यंत जो अ नुभव आपणांस आला त्यावरून जगाच्या उन्नतीचा प्रश्न कोणत्याही एक तर्फी मार्गाने सुटण्यासारखा नाही हे उघड झाले आहे. जगाला सुधारण्याचा हक्क एखाद्या विशिष्ट मानववंशाकडे अथवा राष्ट्राकडे परमेश्वराने सोपवि लेला नाही. असल्या आकुंचित भावनांच्या पायावर जगाची उन्नति व्हाव याची नाही. कोणताही सिद्धांत परोक्षतः कितीहि खरा असला, तरी त्याची सत्यता साया मानवजातीला पटली पाहिजे. प्रत्येक सद्भावनेचा विस्तार इतका झाला पाहिजे की, तिच्यांत सारे मानवकुल बुडून गेले पाहिजे. साऱ्या जीवितभर ही कल्पना व्यापून राहिली पाहिजे. प्राचीन काळी आपल्या देशाची जी स्थिति होती, ती गेल्या काही शतकांच्या अवधींत कां राहिली नाही याचे कारण या विवेचनावरून स्पष्ट होईल.
 प्राचीन काळी दोन मानवकुले एकाच मुळापासून उत्पन्न झाली; पण या दोहोंची परिस्थिति भिन्न असल्यामुळे त्यांची वाढही वेगवेगळ्या दिशांनी झाली; आणि मानवी जीविताचे कूट प्रश्न ती आपापल्यापरी सोडवू लागली. ही दोन कुले हिंदु आणि ग्रीक ही होत. हिंदु आर्यांची वस्ती भरतभूमीत झाली. हिच्या उत्तरेला पर्वतराज हिमालय. या हिमनगराजापासून पुष्कळ मोठमोठ्या नद्यांचा उगम होऊन त्या खाली मैदानावर वहात येतां येतां त्यांचे स्वरूप समुद्राप्रमाणे विशाल झाले. या सपाट प्रदेशी जिकडेतिकडे

स्वा० वि० खं०-९-१५.