पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२२४ स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ. [नवम


ज्ञान याला मुळीच नव्हते; फार काय, पण स्वतःची सही करण्यापुरतीहि अक्षरओळख त्याला नव्हती असे म्हणणे अतिशयोक्तीचे होणार नाही. अशा प्रकारे हे श्रीरामकृष्ण परमहंस मोठे विचित्र गृहस्थ होते. यांचे समग्र चरित्र कथन करणे म्हणजे तो एक मोठा इतिहासच होईल. आजच्या प्रसंगी तसे करण्यास मला वेळ नाही. सध्या मी इतकेंच म्हणतों की, हिंदुस्थानांत जे जे अवतार आजपर्यंत होऊन गेले त्या सर्वांची ऐक्यमूर्ति श्रीरामकृष्ण परमहंस ही होय. पूर्वीचे सारे वेगवेगळे भाग या एका देहांत एकरूपाला आले. चोहो कडे विखरलेलें धर्मकार्य येथे एकत्र झालें, अपूर्णसें भासणारे कार्य येथे पूर्ण त्वास आले. यामुळेच सध्याच्या अवनतस्थितीत हे अवतारकार्य अत्यंत उपयुक्त झाले. रामकृष्ण परमहंस यांचा जन्म एका दरिद्री भिक्षुकाच्या पोटी झाला. हा भिक्षुक एका बाजूच्या लहानशा खेड्यांत रहात होता. त्याच्या अस्तित्वाची खबरही कोणास नव्हती; आणि अशा परिस्थितीत जन्मल्यामुळे श्रीरामकृष्णहि अगदी अप्रसिद्ध होते; पण त्यांच्या पाठीमागे सारी विश्वशक्ति उभी होती. यामुळे आज युरोप, अमेरिका वगैरे साऱ्या जगांतील देशांत कोटयवधि लोक या विभूतीचे पूजन आज करीत आहेत. परमेश्वराची लीला वर्णन करण्याचे सामर्थ्य कोणाला आहे ? त्याची इच्छा काय असेल हे कोणी सांगावें ? सांप्रतच्या काळी भगवान् रामकृष्ण यांचा जन्म व्हावा या गोष्टींत असलेला गूढ ईश्वरी संकेत आज आपणास दिसत नसेल तर तो दोष आपल्या डोळ्यांचा आहे. आपण आंधळे ह्मणून सूर्यप्रकाशहि आपणास दिसत नाही. मित्रहो, तुमच्या भेटीचा आणखी एखादा प्रसंग प्राप्त झाला तर या चरित्राची आणखीहि काही माहिती मी तुम्हांस सांगेन. आज मी इतकेंच म्हणतो की, माझ्या या साऱ्या बडबडीत जर एखादा शब्द सत्यपूर्ण असेल तर तो श्रीरामकृष्णांचा आहे. त्यांजवांचून दुसऱ्या कोणाचीहि मा लकी त्याजवर नाही; आणि यांत जे काही फोल असेल, ज्या पुष्कळशा खोट्या गोष्टी मी बोललों असेन आणि मानवजातीला ज्यांचा कांहींच उपयोग नसेल, अशा साऱ्या वस्तू एकट्या माझ्याच असून त्यांची सारी जबाबदारी

फक्त माझ्याच शिरावर आहे.


-----