पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२१८ स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.[ नवमः


सामान्यांच्या वाणींत आपल्या उपदेशाचे कार्य केले. आपला उपदेश सा मान्य जनतेच्या अंतःकरणापर्यंत थेट पोंचावा म्हणून तिच्याच भाषेत ते बोलू लागले. दरिद्री, दुःखी आणि क्षुद्र अशा लोकांचा सहवास प्रत्यक्ष घडावा म्हणून राज्यासनादि त्यांनी दूर झुगारून दिले. रामाप्रमाणेच शाक्य मुनींनीहि अंत्यजाला निर्भर आलिंगन दिले.
 भगवान् शाक्यमुनींचे अवतारकार्य आणि त्यांचे जीवनचरित्र सर्वांस ठाऊक आहेच. पण अत्यंत दुःखाची गोष्ट ही की, त्या कार्याचा उपयोग व्हावा तितका झाला नाही. हा दोष शाक्यमुनींचा नाही हे उघड आहे. त्यांचे चरित्र अत्यंत पवित्र आणि अत्यंत उज्वल होते याबद्दल कोणास शंकाही येणार नाही; पण त्या वेळी हिंदुस्थानांत ज्या असंस्कृत जाती होत्या, त्यांना इतकी उच्च तत्त्वें पचण्यासारखी नव्हती. आर्याबरोबर इतर पुष्कळ रानटी जातीहि त्या काळी मिसळल्या होत्या. आपले रानटी पूजनप्रकार आणि पुष्कळसे धर्मवेड ही बरोबर घेऊन आर्यांच्या किल्ल्यांत त्यांनी प्रवेश केला होता. आर्यांच्या संस्कृतीची छाप त्यांजवर पडली असावी असे आरंभी वाटले, पण हा निवळ भ्रम होता. एक शतकहि पुरे लोटलें नाहीं तोच त्यांनी आपल्या टोपलीतले सर्प आणि आपली सारी भुतावळ बाहेर काढली. आपल्या साऱ्या प्राचीन पूर्वजांची ही संपत्ति बाहेर काढून ती साऱ्या हिंदु स्थानभर त्यांनी वांटून दिली; आणि अशा रीतीने आर्यावर्ताच्या धर्माची अवनती होऊन तो देश धर्मभोळेपणाचें एक साम्राज्य बनून गेला. आरं भींच्या बुद्धानुयायांनी पशुहनन बंद करण्याकरितां वेदप्रणीत यज्ञयागां वर मोठ्या निकराचा हल्ला केला. प्राचीन काळी प्रत्येक घरी यज्ञ होत असे; आणि धर्मसाधनाचा मुख्य मार्ग तोच गणला जात असे. बौद्धांच्या हल्ल्यांनी या क्रिया बंद पडल्या; आणि त्यांच्या जागी भपकेबाज देवालये, भपकेबाज पूजोपचार आणि स्वयंमन्यमान पुजारीवर्ग या वस्तू निर्माण झाल्या. या साऱ्यांचे अस्तित्व हिंदुस्थानांत आज आपणांपुढे प्रत्यक्ष आहेच. ब्राह्मणांच्या मूर्तिपूजेचा विध्वंस बुद्धदेवानें केला, असें कांहीं अर्वाचीन पंडित म्हणतात, तेव्हां मला खरोखरच मोठे हंसू येतें. गीर्वाण साहित्यांत स्वतःस प्रवीण म्हणविणाऱ्या या पंडितांनी तरी अधिक विचार करावयास हवा होता. ब्राह्मणी

धर्माची उत्पत्ति बुद्धदेवानंतर झाली हे यांस कळावयास हवें होतें.