पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खंड.] हिंदुस्थानांतील तत्त्ववेत्ते.२१७


 आता यापुढे हिंदुस्थानांतील धर्माच्या इतिहासाचा दुःखद काल सुरू होतो. गीतेच्या कालीहि मतामतांतील द्वंद्वांस सुरवात झाली असावी असें दिसते. सारे तंटे आणि द्वंद्व मोडून सर्वत्र सलोखा आणि एकवाक्यता निर्माण करण्याकरितांच परमेश्वर श्रीकृष्णरूपाने अवतरला. भगवान् म्हणतात, 'मयिसर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव ।' या द्वंद्वांस प्रारंभ झाला त्याच्या अगो- दरच्या काळी या सर्व मतांत सहिष्णुता नांदत असावी असे मानण्यास जागा आहे. यानंतर वेगवेगळ्या मतांतच युद्धास सुरवात झाली असें नसून जाति- भेदहि बळावत गेला; आणि जातीजातीतहि परस्पर तंटयास सुरवात झाली. हिंदुसमाजरचनेत क्षत्रिय आणि ब्राह्मण हे दोन प्रमुख आणि सामर्थ्यवान् वर्ण आहेत. आणि याच वर्णात प्रथम युद्धास सुरवात झाली. समाजाच्या थेट अत्युच्च शिखरावरून निघालेला रणनदीचा हा ओघ सान्या हिंदुस्थानभर पसरला; आणि सारा आर्यावर्त त्याखाली बुडून गेला. सुमारे हजार वर्षेपर्यंत अशी परिस्थिति राहिल्यानंतर दुसरा एक देदीप्यमान तारा हिंदभूमीच्या क्षितिजावर उदयास आला. हा गौतम शाक्यमुनि होय. बुद्धदेवाची. मतें आणि त्याने सांगितलेला धर्म यांची सामान्य माहिती बहुधा आपणा सायांस आहेच. भगवान् बुद्धदेवालाहि आम्ही अवतारी पुरुष मानतो. जगांत अत्युच्च नीतीचा धडा बुद्धदेवाने प्रथम शिकविला. बुद्धदेव महान् कर्मयोगी होता. भगवान् श्रीकृष्णांनी गीतेत प्रथम परोक्षतत्वांचे विवेचन केले आणि त्यांचा प्रत्यक्ष आचार कसा करावा हे शिकविण्याकरितांच जणूं काय बुद्धदेवाच्या रूपाने ते पुनः अवतरले.
 स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायतो महतो भयात् हा गीतेचा ध्वनि भरत भूमीत पुनः वावरू लागला. 'स्त्रियो वैश्यास्तथा शूद्राः तेऽपि यांति परां गतिम् असे म्हणण्याचा काळ पुनः आला. सर्वांच्या शृंखलांचे पाश तुटून गेले. ज्ञानमंदिराकडे जाण्याचा रस्ता सर्वांना मोकळा झाला.इहैव तैर्जितः स्वर्गः येषां साम्ये स्थितं मनः। या तत्त्वरत्नाचा उच्च घोष पुनः सुरू झाला. या गीतेंतील वचनांचा आचार प्रत्यक्ष उदाहरणाने दाखविण्याकरिता भगवान् श्रीकृष्ण शाक्यमुनीच्या रूपाने अवतरले. या अवतारांत राजांचें आणि साम्राज्यांचे कार्य त्यांनी केले नाही. शाक्य मुनीचा अवतार दीन दुबळ्यांकरितां होता. शाक्यमुनींनी देवांच्या गीर्वाण वाणीचाहि त्याग करून