पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२१६ स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.[नवम


आरूढ करितें असें तेथे दर्शविलें आहे. पूर्ण कर्मसंन्यास इष्ट असला तरी कर्म त्याज्य नाही. मूर्तिपूजा अखेरचे फळ देत नसली तरी मूर्ति त्याज्य नाही. यज्ञ यागादि क्रिया मोक्षदायी नसल्या, तरी मधल्या मुक्कामाच्या पायऱ्या म्हणून त्याही इष्ट आहेत. सारांश इतकाच की, चित्ताची शुद्धि होण्याकरितां ह्या एकाच हेतूने जी जी क्रिया घडेल ती सारी इष्टच आहे. परमात्मपूजन हेहि इष्ट आहे. कारण, त्या मार्गानेंहि अखेरची सिद्धि प्राप्त होणारी आहे. शुद्ध चित्ताने मूर्तीची पूजा तुम्ही केली तर तीहि इष्टफलदायी होईल. अखेरच्या मुक्कामाकडे जाणारे हे अनेक मार्ग आहेत-आणि इतके अनेक मार्ग असणे हे अवश्यहि आहे. मनुष्यजातीला त्यांची आवश्यकता नसती तर ते निर्माण तरी का झाले असते ? अनेक धर्म आणि अनेक पंथ ही शुद्ध भोंदूंची क्रिया आहे असे म्हणण्याचे कारण नाही. आपमतलबी लोकांनी स्वार्थसाधूपणानें ही जाळी निर्माण केली आहेत असे नाही. केवळ स्वतःचे खिसे भरावे म्हणून या गोष्टी कोणीहि केलेल्या नाहीत. आमच्या अर्वाचीन पंडितांचा तसा समज असेल तर ती नाइलाजाची गोष्ट आहे. त्यांची मतें शुद्ध बुद्धिवादाला पट ण्यासारखी दिसत असली तरी त्यांत सत्याचा अंशहि नाही. हे धर्म आणि हे पंथ यांची उत्पत्ति कोणीही केवळ स्वार्थासाठी केलेली नाही. जीवात्म्याला असलेल्या आवश्यकतेंतूनच ते निर्माण झाले आहेत. मागणीला अनुरूप अशाच वस्तू नेहमी निर्माण होत असतात. 'पिंडे पिंडे मतिर्भिन्ना' या न्यायाने या वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक मुर्तींची तृष्णा शांत करण्याकरिता हे पंथ निर्माण झाले आहेत. याकरितां त्यांजवर एवढे निकराचे हल्ले कर ण्याचे काहीच कारण नाही. त्यांची जरूरी नाहीशी झाली, की तेही आपो आप नाहीसे होतील; आणि त्यांची जरूरी आहे, तोपर्यंत त्यांजविरुद्ध कि तीही कडक टीका तुम्हीं केली अथवा आपली मनगटें तुम्ही कितीहि चावली तरी ते जिवंत राहणारच. तरवारीचा मोठा लखलखाट तुम्ही करा अथवा प्रचंड तोफखाने लावा, काही झाले तरी त्यांचे अस्तित्व राहणारच. सर्व एक धर्म करण्याच्या हेतूने मानवी रक्ताच्या नद्या तुम्ही वाहविल्या तरी मूर्तीचे अस्तित्व नाहीसे होणार नाही. हे अनेक पंथ म्हणजे विश्वव्यापी धर्मातील

अनेक पायऱ्या होत; आणि त्यांचे अस्तित्व का आहे याचा उलगडा भगवान् श्रीकृष्णांनी गीतेंत उत्तम प्रकारे केला आहे.