पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

खंड] कैवल्याचा मार्ग. १७

पुष्कळ मनुष्ये अत्यंत अज्ञानांत अगदी बुडून गेली असतांही केवळ घमेंडीमुळे स्वतःस पंडित समजत असतात. अशी मनुष्ये स्वतः अंध असतांही दुसऱ्यांचे पुढारीपण पत्करतात, आणि मग अशा रीतीने एक आंधळ्यांची मालिका तयार होते. ही मालिका एखाद्या लहानशा जागेत चक्राकार फिरत राहते, परंतु कोणालाच दृष्टि नसल्यामुळे आपण पुष्कळ लांब पल्ल्याचा प्रवास केला असा भ्रम मात्र सर्वांस उत्पन्न होतो. केवळ बालबुद्धीच्या मूर्ख लोकांच्या हृदयांत सत्य कधीही प्रकाशत नाही. नाचिकेता, केवळ लौकिक वस्तूंच्या मागें जो लागलेला असतो, त्याला मृत्पिंडांपेक्षा अधिक कशाची प्राप्ति होणार ? अशा मनुष्यांना ऐहिक अथवा पारलौकिक यांपैकी कशाचेच ज्ञान होत नाही. त्यांची ऐहिक यात्रा ज्याप्रमाणे निष्फल होते, त्याचप्रमाणे परलोकाचेही काही साधन त्यांनी केले नसल्यामुळे तिकडेही ते पारखे होतात आणि वारंवार माझ्या सपाट्यांत सांपडतात. सत्य वस्तु काय आहे याबद्दल एक शब्दसुद्धां पुष्कळांच्या कानी पडत नाही. त्या बिचाऱ्यांना तशी संधि केव्हांच सांपडत नाहीं; आणि काहींच्या कानी तिची वाती गेली तरी तिजबद्दल त्यांना उमज पडत नाही. कारण हे ज्ञान सांगणारा गुरु आणि तें ऐकणारा शिष्य हे दोघेही अत्यंत कुशल आणि मर्मज्ञ असावे लागतात. वक्ता उच्च प्रतीचा नसेल तर शेकडों वेळां केलेलें वक्तृत्वही कांहीं कामी पडत नाही. अशा वक्त्याकडून श्रोत्याने शेकडों वेळां ही चर्चा ऐकली तरी त्याच्या हृदयांत ज्ञानाचा प्रकाश यत्किंचितही पडत नाही. नाचिकेता, वादविवादांत तूं आपले आयुष्य फुकट घालवू नको. वादविवाद कितीही केला तरी अंतःकरण शुद्ध झाल्यावांचून सत्य तेथें प्रकाशणार नाही. अत्यंत मोठ्या परिश्रमावांचून ज्याचे दर्शन होत नाही, जो अत्यंत गुप्त आहे आणि जो अंतःकरणाच्या अत्यंत खोल भागी जाऊन बसला आहे, अशा त्या प्राचीन एकरूपाचे दर्शन बाह्य जड चढूंनी होणार नाही. त्याचे दर्शन एकवार ज्याला झालें तो मनुष्य सुखदुःखातीत होतो. सुख आणि दुःख या दोहोंचीही किंमत त्याला वाटत नाही. ज्याला हे रहस्य कळलें तो आपल्या साऱ्या क्षणिक इच्छा सोडून देतो. त्याच्या अंतःकरणांतून साऱ्या दुराशा नष्ट झाल्या म्हणजे या शुभ दर्शनाला तो योग्य होतो, आणि अखेरीस कैवल्यरूप होतो.नाचिकेता, कैवल्यपदाला पोहोचण्याचा मार्ग हा आहे. सद्गुण आणि दुर्गुणस्वा०वि०२-९